प्रत्येक क्रिकेटपटूला वाटतं की, त्याने आपल्या देशासाठी खेळावं आणि जोरदार कामगिरी देखील करावी. मात्र खूप कमी खेळाडू आहेत, ज्यांच हे स्वप्न पूर्ण होतं. भारतीय संघातील दिग्गज फिरकीपटू गोलंदाज आर अश्विन देखील भारतीय संघासाठी जोरदार कामगिरी करतोय. नुकताच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो पाचवा फिरकी गोलंदाज ठरला आहे. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये ४५० पेक्षा अधिक गडी बाद करणाऱ्या फिरकी गोलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत.
मुथय्या मुरलीधरन:
श्रीलंका संघाचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. मुरलीधरनने १३३ सामन्यांमध्ये ८०० गडी बाद केले आहेत. यादरम्यान ५१ धावा खर्च करत ९ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने १९९९ पासून ते २०१० पर्यंत श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
शेन वॉर्न:
ऑस्ट्रेलिया संघातील दिवंगत गोलंदाज शेन वॉर्न या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तो सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. उजव्या हाताच्या या गोलंदाजाने १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ गडी बाद केले होते. यादरम्यान ७१ धावा खर्च करत ८ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने ३७ वेळेस ५ गडी बाद करण्याचा तर १० वेळेस एकाच सामन्यात १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.
अनिल कुंबळे:
कसोटी क्रिकेटच्या एकाच डावात १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारे अनिल कुंबळे या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे चौथ्या स्थानी आहेत. त्यांच्या नावे १३२ कसोटी सामन्यांमध्ये ६१९ गडी बाद करण्याची नोंद आहे. यादरम्यान ७४ धावा खर्च करत १० गडी बाद ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे.
नॅथन लायन:
ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायन हा या यादीत चौथ्या स्थानी आहे. लायनने ११६ कसोटी सामन्यांमध्ये ४६० फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. तर एका डावात ५० धावा खर्च करत ८ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सध्या तो भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करतोय.
आर अश्विन:
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ८९ सामन्यांमध्ये ४५२ गडी बाद केले आहेत. यादरम्यान एकाच डावात ५९ धावा खर्च करत ७ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. ऑस्ट्रेलिया विरुध्द सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने ३ गडी बाद केले आहेत.
काय वाटतं, आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम मोडू शकतो का? कमेंट करून नक्की कळवा.
