जेव्हा आफ्रिदिने भारतीय गोलंदाजांना रडवत, ठोकले होते वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद शतक; वाचा तो किस्सा

जेव्हा आफ्रिदिने भारतीय गोलंदाजांना रडवत, ठोकले होते वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद शतक; वाचा तो किस्सा

पाकिस्तान संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi)  हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक होता. तो फलंदाजीला आला की, गोलंदाजांचा थरकाप उडायचा. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम याच खेळाडूच्या नावावर आहे. आफ्रिदीने १९९६ मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या ३७ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. केवळ हेच नव्हे तर त्याने वनडे क्रिकेटमध्ये अनेक अशा खेळ्या केल्या आहेत, ज्या नेहमीच क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहतील. त्यापैकीच एक खेळी त्याने आजच्याच दिवशी (१५ एप्रिल) २००५ मध्ये भारतीय संघाविरुद्ध केली होती. 

भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं तर मैदानात नेहमी प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं असतं. १५ एप्रिल २००५ मध्ये कानपूरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले होते. या सामन्यात शाहिद आफ्रिदीच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडला होता. त्याने तुफान फटकेबाजी करत अवघ्या ४६ चेंडूंमध्ये १०२ धावांची शतकी खेळी केली होती. यादरम्यान त्याने १० चौकार आणि ९ गगनचुंबी षटकार मारले होते. आजही हे भारतीय संघाविरुद्ध झळकावलेले सर्वात वेगवान शतक आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय कर्णधार राहुल द्रविडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटक अखेर ६ बाद २४९ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून कर्णधार द्रविडने ११५ चेंडूंमध्ये ८६ धावा केल्या होत्या. तर मोहम्मद कैफने ८८ चेंडूत ७८ धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात, पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करताना, आफ्रिदीच्या फलंदाजीने असा कहर केला की पाकिस्तानने ४३ व्या षटकात ५ गडी राखून सामना जिंकला.

आफ्रिदीशिवाय पाकिस्तानकडून शोएब मलिकने ६० चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले होते. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अनिल कुंबळेने दोन, तर हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागने प्रत्येकी एक गडी बाद केला होता. या खेळीसाठी आफ्रिदीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडत वनडेमध्ये सर्वात जलद शतक झळकावले होते. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धचे शतक अवघ्या ३१ चेंडूत पूर्ण केले होते.