भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांची गणना आजही जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरचे सुनील गावस्कर हे आदर्श आहेत. भारतीय संघाकडून तब्बल १६ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या सुनील गावस्कर यांनी अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. आजच्याच दिवशी (७ मार्च ) ३५ वर्षांपूर्वी त्यांनी असा काही पराक्रम केला होता, ज्यामुळे त्यांची इतिहासात नोंद झाली होती.
लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी आजच्याच दिवशी (७ मार्च १९८७ ) कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला होता. असा पराक्रम करणारे ते पहिलेच फलंदाज ठरले होते. त्यांनी अहमदाबादच्या मैदानावर पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता.
लिटिल मास्टर सुनील गावस्कर नंतर अनेक असे फलंदाज होऊन गेले ज्यांनी १० हजार धावांचा डोंगर सर केला. परंतु जेव्हा जेव्हा कुठलाही फलंदाज हा विक्रम आपल्या नावावर करेल त्यावेळी सुनील गावस्करांचे नाव देखील आवर्जून घेतले जाईल. सुनील गावस्कर पहिले असे फलंदाज होते ज्यांनी हा विक्रम केला होता.
अशी राहिली आहे कारकीर्द
सुनील गावस्कर यांनी आपल्या कारकीर्दीत भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीचा आढावा घेणं थोड कठीण आहे. परंतु त्यांच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेऊया. त्यांनी १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १२५ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ५१.१२ च्या सरासरीने १०,१२२ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यांनी ४ दुहेरी शतक, ३४ शतक आणि ४५ अर्धशतक केले होते. तसेच त्यांच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी १०८ वनडे सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी ३५.१४ च्या सरासरीने ३०९२ धावा केल्या होत्या. १९७१ मध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते.




