मोठ्या मनाचे भारतीय खेळाडू! पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर केले असे काही : पाहा फोटो

मोठ्या मनाचे भारतीय खेळाडू! पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर केले असे काही : पाहा फोटो

सध्या न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने जोरदार सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तान संघाला पराभूत करत विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील ११ वा विजय संपादन केला. दरम्यान या सामन्यानंतर असे काहीतरी घडले होते ज्याचे फोटो  सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येत असतात, त्यावेळी चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. क्रिकेटच्या मैदानावर खेळत असताना आपला संघ जिंकावा म्हणून हे खेळाडू वाट्टेल ते करायला तयार असतात. परंतु मैदानाबाहेर या खेळाडूंचे मैत्री संबंध पाहायला मिळाले आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय महिला संघातील खेळाडूंनी पाकिस्तान संघाची कर्णधार बिस्माह मारूफची कन्या फातिमा सोबत मस्ती करत तिचे लाड केले. तसेच भारतीय महिला संघांतील खेळाडूंनी ६ महिन्याच्या फातिमासोबत फोटो देखील क्लिक केले.

हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर देखील एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून "भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटच्या भावनेतील फातिमाचा पहिला धडा." असे लिहिले आहे.तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना पूजा वस्त्राकरने ६७ धावांची खेळी केली. तर स्नेह राणाने नाबाद ५३ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाला ५० षटक अखेर ७ बाद २४४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव ४३ षटकात १०७ धावांवर संपुष्टात आला. हा सामना भारतीय संघाने १०७ धावांनी आपल्या नावावर केला