रशिया - युक्रेन युद्ध: युक्रेनच्या खेळाडूने टेनिस स्पर्धेत रशियाच्या खेळाडू सोबत खेळण्यास दिला नकार

रशिया - युक्रेन युद्ध: युक्रेनच्या खेळाडूने टेनिस स्पर्धेत रशियाच्या खेळाडू सोबत खेळण्यास दिला नकार

सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचे परिणाम आता क्रीडा क्षेत्रावरही होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक क्रमवारीत १५ व्या क्रमांकावर असलेल्या युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने माँटेरी ओपन स्पर्धेत रशियाच्या अनास्तासिया पोटापोवा सोबत खेळण्यास नकार दिला आहे.

एलिना स्वितोलिनाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. माँटेरी ओपन स्पर्धेत तिची पहिलीच लढत रशियाच्या अनास्तासिया पोटापोवा सोबत होणार आहे. तसेच तिला रशिया आणि बेलारूसच्या कुठल्याही खेळाडूचा सामना करायचा नाहीये.

एलिना स्वितोलिनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत लिहिले की, "मी रशियातील कुठल्याही खेळाडूला दोष देत नाहीये. ते आमच्या मातृभूमीवर आक्रमण करण्यास जबाबदार नाहीये." स्वितोलिनाने दोन वेळेस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. स्वितोलिनासह युक्रेनच्या इतर खेळाडूंनीही आपला आवाज दिला आहे.