असं म्हणतात, की व्यक्तीचा भूतकाळ हा कायम सावलीसारखी त्याची साथ करतो. भूतकाळातल्या क्षणांशी, आठवणींशी जोडलं जाण्यासाठी फोटोहून चांगलं साधन नाही. हवं तेव्हा एखादा क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करणं आज सहजसोपं असलं तरी पूर्वी महाकठीण होतं. त्याकाळी फोटो काढण्यासाठी वापरण्यात येणारं कॅमेरा नामक यंत्र हे फक्त प्रोफेशनल स्टुडिओच्या चार भिंतीत बंदिस्त होतं, ते सर्वसामान्य लोकांच्या हातातलं नव्हतं. ते सामान्य लोकांच्या आवाक्यात आणण्याचं श्रेय जातं ते कोडॅक या कंपनीकडे.
कोडॅक हे फोटोग्राफी आणि कॅमेऱ्याच्या जगातलं सगळ्यात मोठं नाव. १९६०-७० च्या दशकात घेतलेले बहुतेक फोटो कोडॅकच्या कॅमेर्याने टिपलेले आणि कोडॅक पेपरवर प्रिंट केलेले आहेत. एकेकाळचं कॅमेरा उद्योगाचं हे अनभिषिक्त साम्राज्य २०१२ मध्ये मात्र उतरणीला लागलं. तसं पाहता आजही ही कंपनी अस्तित्वात आहे, पण अगदी छोट्या प्रमाणात. असं काय घडलं ज्यामुळे एवढ्या मोठ्या कंपनीवर ही वेळ आली?
कोडॅक कॅमेरा आणि उद्योग यामागचं श्रेय आहे जॉर्ज इस्टमन नावाच्या माणसाचं. त्यापूर्वी फोटोग्राफी हे अतिशय किचकट काम होतं. त्यासाठी वापरायचे कॅमेरे आकाराने मोठे आणि अवजड असत. शिवाय त्याची प्रिंट त्वरित डेव्हलप करावी लागत असल्यामुळे त्यासाठीची साधनसामग्री ही जवळच ठेवावी लागे. जॉर्ज इस्टमनमुळे हे चित्र बदललं. त्याच्यामुळे फोटोग्राफी आणि कॅमेरा सर्वसामान्य माणसाच्या हातात आले. 'यू प्रेस द बटन, वुई डू द रेस्ट' हे सुरुवातीचं कंपनीचं स्लोगन पुरेसं बोलकं होतं.



