मंडळी, सध्या जगभर विश्वचषकाचीच हवा आहे. घराघरातून सीरीयल्सच्या डायलॉग्सऐवजी मॅचची कॉमेंट्री ऐकू येतेय. सगळं वातावरण क्रिकेटमय झालंय. पण दरवेळी कोणत्या ना कोणत्या बाबतीत प्रॉब्लेम असतोच. आत्ता एलईडी बेल्स चर्चेत आहेतच, पण आणखीन एक मुद्द्यावर वाद चालू आहेत. आणि तो म्हणजे विश्वचषकात वापरला जाणारा चेंडू. ह्या चेंडूवर आत्तापर्यंत अनेकजणांनी आक्षेप घेतलेले आहेत. काय आहेत हे आक्षेप? जाणून घेऊया आजच्या लेखात...
विश्वचषकात वापरला जाणारा चेंडू कुकाबुरा ह्या नावाने ओळखला जातो. हे चेंडू ऑस्ट्रेलियातल्या कुकाबुरा कंपनीतर्फे उत्पादित केले जातात. हे चेंडू इंग्लंड, भारत आणि वेस्ट इंडीज हे देश वगळता सर्वत्र वापरले जातात. इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमधे ड्यूक कंपनीचे चेंडू वापरले जातात, तर भारतात एसजी कंपनीचे चेंडू वापरण्यावर भर असतो. आज आपण कुकाबुरा चेंडूवरचे आक्षेप बघताना या तिन्ही चेंडूंची थोड्याफार प्रमाणात तुलनासुद्धा करणार आहोत.








