कबड्डी, रांगड्या मातीचा रांगडा खेळ.तसेच या खेळाचे खेळाडू ही असतात अस्सल फौलादी. अश्याच एका महाराष्ट्राच्या खेळाडू बद्दल आपण जाणून घेणार आहोत. गिरीश मारुती एर्नाक, नावात जोर तसच मैदानावर ही दमखम. कबड्डी खेळात कल्याण सारख्या महाराष्ट्राच्या छोट्या शहरातून आलेला हा स्टार खेळाडू. या खेळाडूने भारतीय संघाला जागतिक पातळीवर कबड्डी खेळामध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले . चला तर जाणून घेऊया या खेळाडूबद्दल अधिक माहिती.
गिरीश मारुती एर्नाकचा जन्म २२ डिसेंबर १९९२ ला झाला. अगदी लहान वयापासूनच गिरीश कबड्डी खेळाकडे आकर्षित झाला होता. जसं एखादी वास्तू बांधतांना पायाभरणी करणे गरजेचे असते, तसेच खेळाडूला देखील सराव आणि प्रोत्साहनाची गरज असते. प्रत्येक खेळाडूला पहिला गुरू हा शाळेतच मिळत असतो. होय प्रत्येकाच्या शाळेत क्रीडा शिक्षक असतातच, तेच आपल्याला खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. आंतरशालेय क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करून घेत असतात. तसेच गिरीश एर्णाकला सुद्धा वयाच्या १४ व्या वर्षी त्याच्या क्रीडा शिक्षक सुनील कोळी सर यांनी या खेळात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं.
एकदा सुरुवात केली की, पुन्हा माघार घ्यायची नसते. हाच निश्चय करून गिरीश एर्नाक पुढे निघाला. प्रोफेशनल कबड्डी खेळायची असेल तर क्लबची गरज असते . क्लबमध्ये काहीतरी वेगळं नवीन शिकायला मिळत असतं. म्हणून सुनील कोळी सर यांनी त्याला ओम क्रीडा मंडळात सहभागी हो, अस सांगितलं आणि गिरीशने कल्याणमध्ये असलेल्या ओम क्रीडा मंडळात प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिथे त्याला अनुभवी आणि राष्ट्रीय खेळाडूंकडून कबड्डीचे नव नवीन धडे शिकायला मिळाले. महाराष्ट्र ही कबड्डीची खान आहे, हे उगाच म्हटले जात नाही. इथे उत्कृष्ठ खेळाडू जन्माला येत असतात.
खेळात उंच भरारी घ्यायची असेल तर आधी जिल्हास्तरीय , राज्यस्तरीय मग राष्ट्रीय पातळीवर निवड होऊन खेळाडूला आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर विजय मिळवून देता येतो. गिरीशने ही खूप मेहनत घेतली आहे. आधी शालेय स्तरावर यश मिळवून मग तालुका पातळी, जिल्हा पातळी आणि मग राज्यस्तरीय स्पर्धा मग कुठे जाऊन राष्ट्रीय पातळीवर खेळायला संधी त्याला मिळाली.
कबड्डी साठी शरीराला नियमित व्यायाम आणि डाएट ची गरज असते. तसेच गिरीश हा ओम क्रीडा मंडळ पासून थोड्या दूर राहत असे. त्यामुळे रोज येणं जाणं करणं कठीण जात असे. परंतु त्याने हार मानली नाही आणि कबड्डी स्पर्धा जिंकून येणाऱ्या पैश्यातून त्याने एक जुण्यातली सायकल विकत घेतली. मनात धैय्य असेल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही हे या गोष्टीचे जिवंत उदाहरण आहे. गिरीश ने ठाणे संघाचे नेतृत्व केले आहे.तसेच महाराष्ट्राला २८ वर्षा नंतर राष्ट्रीय पातळीवर विजय मिळवून देण्यात गिरीशचा खूप मोठा मोलाचा वाटा होता. गिरीशला संधी मिळाली प्रो कबड्डी स्पर्धेत २०१५ च्या हंगामात पटना पायरेट्स संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू राकेश कुमार यांनी त्याला आपल्या संघात खेळण्यासाठी बोलावून घेतले. त्यांनतर २०१६ मध्ये त्याला बंगाल वॉरियर्स या संघाने आपल्या संघात समाविष्ट केले आणि त्यानंतर २०१७ पासून ते २०२० पर्यंत गिरीश एर्णाकने पुणेरी पलटण या संघासाठी त्याने प्रमुख भूमिका बजावली होती. नुकताच संपन्न झालेल्या प्रो कबड्डीच्या हंगामात त्याने गुजरात जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
गिरीश मारुती एर्णाकची ओळख म्हणजे उत्कृष्ट डावा कोपरा अशी आहे. भारतीय संघातून खेळताना सुद्धा सुरेंद्र नाडा आणि मोहित चिल्लर या उत्कृष्ट जोडीची चांगली भागीदारी होत असताना,गिरीशला एक संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने करत गिरीशने, दुबई येथे झालेल्या दुबई मास्टर्स स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. तसेच आशियाई स्पर्धेत देखील त्याने भारतीय संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे.
