नोएडाच्या रस्त्यावर रात्री १२ वाजता धावणारा मुलगा!!! त्याला सगळीकडून कशासाठी मदत येत आहे?

नोएडाच्या रस्त्यावर रात्री १२ वाजता धावणारा मुलगा!!! त्याला सगळीकडून कशासाठी मदत येत आहे?

सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग्य बनला आहे. पण या सोशल मीडियाबाहेरील जग देखील तितकेच मोठे आहे. आपल्या आसपास असेही लोक आहेत ज्यांना सोशल मीडियावर वावरणे परवडत नाही. फावला वेळ आणि पैसा दोन्हीही तितका नसणे ही कारणं तर आहेतच, पण यांच्यापैकी काही लोक मात्र अचानक सोशल मीडियावर हिरोही झालेली आजकाल दिसत आहेत.

विनोद कापरी म्हणून राशी 5 पुरस्कार विजेते एक सिनेनिर्माते आहेत. डिस्ने-हॉटस्टारवर त्यांची 1232km नावाची मालिकाही आहे. तर हे विनोद कापरी आपल्या घरी रात्री बारा वाजता परतत असताना त्यांना एक मुलगा धावताना दिसला. त्याला काही अडचण असेल असे म्हणून त्यांनी गाडी उभी केली, पण त्यांना आलेला अनुभव अनेकांना प्रेरित करत आहे.

रस्त्यावर धावणाऱ्या या मुलाचे नाव प्रदीप मेहरा असे आहे. तो १९ वर्षांचा आहे. विनोद कापरी यांनी या प्रदीप मेहरासोबत केलेली फक्त २ मिनिटांची चर्चा ही कोणत्याही मोठ्या मोटिव्हेशनल स्पीकरच्या भाषणापेक्षा दमदार आहे आणि म्हणूनच ती क्लिप तुफान व्हायरल होत आहे.

प्रदीप मेहरा मूळचा उत्तराखंडच्या अलमोरा इथला आहे. नोएडा येथे रात्री १२ वाजेपर्यंत काम करून तो धावत १६ किलोमीटर अंतरावरच्या त्याच्या खोलीवर जातो. तो असे का करतो हे जेव्हा कापरी यांनी विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले की आपण आर्मी भरतीची तयारी करत आहोत. रनिंगला वेळ मिळत नाही म्हणून या निमित्ताने तेही काम होते.

सकाळी ८ वाजता उठून स्वतःचा स्वयंपाक बनवायचा, कामाला धावत जायचे. रात्री ११ ला काम संपल्या परत धावत रूमवर यायचे इतका जबरदस्त संघर्ष सुरू असूनही हा पठ्ठ्या मात्र आयुष्याबद्दल कुठलीही तक्रार करताना दिसत नाही. संघर्ष कसा एन्जॉय करायचा याचा सर्वात मोठा 'लाईफ लेसन' प्रदीप मेहरा आपल्याला देऊन जातो.

प्रदीपला जेव्हा कापरी यांनी घरी जेवण्यास येण्याचे आमंत्रण दिले, तेव्हा मी जर रूमवर जाऊन जेवण बनविले नाही तर नाईट शिफ्टवर गेलेला माझा भाऊ भुकेला राहील असे सांगून त्याला एका मोठ्या डायरेक्टरने दिलेली जेवणाची ऑफर तो नम्रपणे नाकारतो. प्रदीप मेहराची मेहनत, त्याची सकारात्मकता लोकांचे मन जिंकून घेत आहे.

 

हा व्हिडिओ जेव्हा कापरी यांनी ट्वीटरवर पोस्ट केला तेव्हा अनेक मोठ्या यशस्वी लोकांनी प्रदीपचे कौतुक केले. यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत, हरभजन सिंग, स्वप्नील जोशी, माजी आयएएस शाह फैजल, असे अनेक दिग्गज आहेत. हे सर्व अवघ्या १९ वर्षं वयात प्रदीपमध्ये असलेली समजदारी, मेहनती स्वभाव यामुळे प्रभावित झाले आहेत.

प्रदीपचा हा व्हिडीओ एकाच दिवसात तब्बल ४० लाख लोकांनी बघितला आहे. त्याला अनेक लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. देशातील आर्मी भरतीची ट्रेनिंग देणारी सर्वात मोठी मिनर्व्हा अकॅडमीने त्याला मोफत प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

प्रदीपचा व्हिडीओ व्हायरल होऊन अनेक लोकांनी जरी मदतीचा हात पुढे केला असला तरी प्रदीप असाही त्याच्याच धुंदीत आयुष्य जगत होता. प्रदीपची हीच गोष्ट खरंतर सर्वांना प्रभावित करून गेली आहे.

उदय पाटील