भारत आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. संपूर्ण भारतात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. स्वतंत्र भारतात क्रिकेटला देखील धर्म मानले जाते. १९४७ नंतर पहिल्यांदाच स्वतंत्र भारताचा संघ कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत क्रिकेटमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. जेव्हा जेव्हा भारत - पाकिस्तान संघ आमने सामने येत असतात, त्यावेळी भारतीयांच्या मनातली देशभक्ती ओसंडून वाहत असते. प्रत्येक भारतीय फक्त एकच नारा देत असतो ते म्हणजे, " जीतेगा भाई जीतेगा.इंडिया जीतेगा..." मात्र तुम्हाला माहीत आहे का? भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर हे दोघेही संघ पहिल्यांदा कसोटी सामना खेळण्यासाठी केव्हा आमने सामने आले होते? नाही ना? चला तर मग जाणुन घ्या.
एक काळ होता,ज्यावेळी या दोन्ही देशातील खेळाडू स्थानिक पातळीवर स्पर्धांमध्ये एकाच संघासाठी खेळायचे. मात्र १९४७ मध्ये विभागणी झाल्यानंतर, केवळ दोन राष्ट्रांनाच जन्म दिला नाही तर क्रिकेटच्या सर्वात मोठ्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांनाही जन्म दिला.
केव्हा पार पडला होता भारत - पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना?
भारत स्वतंत्र झाल्यानंतर १६ ऑक्टोबर १९५२ रोजी भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ पहिल्यांदा कसोटी सामना खेळण्यासाठी आमने सामने आले होते. हा सामना दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये पार पडला होता. १९४८ मध्ये आयसीसीचे सदस्यत्व मिळवल्यानंतर पाकिस्तान संघ पहिल्यांदा १९५२ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता.
हे होते दोन्ही संघांचे कर्णधार
भारत स्वतंत्र झाल्यानंतर लाला अमरनाथ यांनी पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तर या ऐतिहासिक सामन्यात पाकिस्तान संघाची जबाबदारी अब्दुल कार्दरने पार पाडली होती.
असे होते दोन्ही संघ...
भारतीय संघ :
१)लाला अमरनाथ (कर्णधार)
२)पॉली उमरीगर
३)विनू मांकड
४) विजय हजारे
५)पंकज रॉय
६)विजय मांजरेकर
७) हेमू अधिकारी
८)गुल मोहम्मद
९) गुलाम अहमद
१०)गुलाबबाई रामचंद
११)खोखन सेन
१२)दत्ता गायकवाड
१३)नाना जोशी
१४)हिरालाल गायकवाड
१५)एचएम दाणी (बाल दाणी)
१६)सुभाष गुप्ते
१७)माधव आपटे
१८) रुसी मोदी
पाकिस्तान संघ :
१) अब्दुल कारदार (कर्णधार)
२) इम्तियाज अहमद
३)खुर्शीद अहमद
४)मकसूद अहमद
५)झुल्फिकार अहमद
६)इसरार अली
७)रुसी दिनशॉ
८)अमीर इलाही
९)वकार हसन
१०)अन्वर हुसेन
११)महमूद हुसेन
१२)खालिद इबादुल्ला
१३)फजल महमूद
१४)हनीफ मोहम्मद
१५)खान मोहम्मद
१६)नजर मोहम्मद
१७) वजीर मोहम्मद
१८)खालिद कुरेशी
कोणी जिंकला मालिकेतील पहिला सामना?
भारत - पाकिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्यात भारतीय संघ बाजी मारली होती. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव ७० धावांनी विजय मिळवला होता.
काय लागला मालिकेचा निकाल?
या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. ही मालिका भारतीय संघाने २-१ ने आपल्या नावावर केली होती. तर २ सामने ड्रॉ राहिले होते.




