भारतीय संघ (Indian team) सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. आयर्लंड,इंग्लंड नंतर वेस्ट इंडिज संघाला पराभूत करत भारतीय संघाने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. येत्या काही दिवसांत भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहेत. हे दोन्ही संघ आतापर्यंत एकूण ६३ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ५३ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर १० सामन्यांमध्ये झिम्बाब्वे संघाला विजय मिळवता आला आहे. या मालिकेपूर्वी आम्ही तुम्हाला ५ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.
१) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar):
भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये झालेल्या वनडे मालिकांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दिग्गज भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकांमध्ये ४९.१७ च्या सरासरीने १३७७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा फलंदाजीचा स्ट्राईक रेट ९१.५५ होता. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध ५ शतके देखील झळकावली होती.
२) सौरव गांगुली (Sourav Ganguly) :
सध्या बीसीसीआय अध्यक्षांची जबाबदारी पार पाडत असलेले सौरव गांगुली या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. सौरव गांगुलीने झिम्बाब्वे विरुध्द झालेल्या वनडे मालिकांमध्ये ४२.७१ च्या सरासरीने १३६७ धावा केल्या आहेत. सौरव गांगुलीने या धावा ७४.८२ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके देखील झळकावली आहेत.
३) अँडी फ्लॉवर (Andy flower) :
झिम्बाब्वे संघातील दिग्गज क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. झिम्बाब्वे संघाला विजय मिळवून देण्यात अँडी फ्लॉवरने अनेकदा मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने भारतीय संघाविरुद्ध झालेल्या मालिकांमध्ये ४०.५६ च्या सरासरीने १२९८ धावा केल्या आहेत. या धावा त्याने ७५.२९ च्या स्ट्राइक रेटने केल्या होत्या. त्याला भारतीय संघाविरुद्ध एक शतक झळकावण्यात यश आले आहे.
४) ॲलिस्टर कॅम्पबेल (alastiar campbell)
झिम्बाब्वे संघातील दिग्गज फलंदाज ॲलिस्टर कॅम्पबेल या यादीत चौथ्या स्थानी आहे. कॅम्पबेलने भारताविरुद्ध झालेल्या वनडे मालिकांमध्ये ३५.०५ च्या सरासरीने आणि ७३.८२ च्या स्ट्राइक रेटने १२२७ धावा केल्या आहेत. कॅम्पबेलने भारतीय संघाविरुद्ध खेळताना शतकही ठोकले आहे.
५) ग्रँट फ्लॉवर (Grant flower) :
भारत - झिम्बाब्वे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप -५ फलंदाजांच्या यादीत झिम्बाब्वेचा फलंदाज ग्रँट फ्लॉवर पाचव्या स्थानी आहे. या दिग्गज क्रिकेटपटूने भारतीय संघाविरुद्ध ३१.४८ च्या सरासरीने ११६५ धावा केल्या आहेत. त्याने भारतीय संघाविरुद्ध खेळताना एक शतक देखील झळकावले आहे.
काय वाटतं? कोणता भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडून काढू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.




