काय?? धक्का बसला ना? आम्हाला पण बसलाय. पण आधी पूर्ण बातमी तर ऐकून घ्या. तर झालंय असं की, सध्या स्पेनमध्ये COTIF 2018 ही स्पर्धा चालू आहे. त्यात भारताच्या अंडर 20 फुटबॉल टीमनं 3 वेळा अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियन्स असलेल्या अर्जेन्टीना संघाचा पराभव केला.
तर या आजवरच्या सर्वात यशस्वी संघाच्या सोबतचा हा सामना. त्यात आपल्या संघाला एक रेड कार्ड मिळालेलं. म्हणजेच थोडक्यात काय, तर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती. पण ह्यातूनही मात काढत आपल्या पोरांनी 2-1 अशा गोल फरकाने विजय मिळवला.
दीपक तांगरीने चौथ्या मिनिटात, तर अन्वर अलीने ६८ व्या मिनिटाला भारतातर्फ गोल केले आणि या संघाचा या स्पर्धेतला पहिला विजय मिळवला. या आधी या संघाला दोन सामन्यात पराभव, तर एका सामन्यात बरोबरीला सामोरे जावे लागले होते.
सध्या भारताचा सिनियर संघ हा आजवरच्या सर्वोत्कृष्ट रँकिंगवर आहे आणि या अंडर 20 टीमनं असाच खेळ खेळला, तर एक दिवशी भारताला अर्जेंटिनासोबत वर्ल्डकपमध्ये दोन हात करताना बघता येईल असे स्वप्न बघायला हरकत नाही. एकूणच आता भारतीय फुटबॉलला बरे दिवस यावेत अशी आशा करूयात..
