भारतीय संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. त्यामुळे भारतीय संघात स्थान मिळवणं खूप कठीण गोष्ट असते. तसेच संघातील स्थान टिकवून ठेवणं त्यापेक्षाही अधिक कठीण गोष्ट असते. भारतीय संघात देखील अनेक असे खेळाडू होऊन गेले, जे फ्लॉप कामगिरी केल्यामुळे संघाबाहेर झाले आणि त्यानंतर कधीही पुनरागमन करू शकले नाही. शेवटी त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
काही दिवसांपूर्वी भारतीय संघातील अनुभवी फलंदाज मुरली विजयने पुनरागमन करण्याची संधी न मिळाल्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही भारतीय खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, जे लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करू शकतात.
१) दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) :
आयपीएल २०२२ स्पर्धा ही दिनेश कार्तिकच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरली. कारण गेली अनेक महिने तो पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याला संधी दिली जात नव्हती. आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात संधी मिळाली आणि त्याने आयपीएल २०२२ स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. त्याला आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धा देखील खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याला या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याची आताची कामगिरी पाहता, लवकरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करू शकतो.
२००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दिनेश कार्तिकने २६ कसोटी, ९४ वनडे आणि ६० टी -२० सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ७ अर्धशतकांसह त्याने १०२५ तसेच ९४ वनडे सामन्यांमध्ये ९ अर्धशतकांसह १७५२ धावा केल्या आहेत.
२) ईशांत शर्मा ( Ishant Sharma) :
ईशांत शर्मा भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता खूप कमी आहे. ३४ वर्षीय ईशांत शर्मा नोव्हेंबर २०२१ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळताना दिसून आला होता. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला यश मिळाले नाही. भारतीय संघात असे अनेक वेगवान गोलंदाज आहेत, जे सध्या चांगली कामगिरी करत आहेत. ईशांतने १०५ कसोटी सामन्यांमध्ये ३११ गडी बाद केले आहेत. तर ८० वनडे सामन्यांमध्ये त्याने ११५ गडी बाद केले आहेत. भारतीय संघातील इतर वेगवान गोलंदाजांची कामगिरी पाहता, ईशांत शर्माचे पुनरागमन करणे कठीण दिसून येत आहे. त्यामुळे तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करू शकतो.
३) करुण नायर(Karun Nair) :
भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा फलंदाज आठवतो का? हा तोच फलंदाज आहे करुण नायर. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम फलंदाजी करत तिहेरी शतक झळकावले आणि त्यानंतर गायब झाला. गायब म्हणजे, त्याला संधीच मिळाली नाही. करुण नायरला भारतीय संघासाठी ६ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. या ६ सामन्यांमध्ये त्याने केवळ ३७४ धावा केल्या. यादरम्यान ३०३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. त्याने शेवटचा कसोटी सामना २०१७ मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघाची जर्सी परिधान करण्याची संधी मिळाली नाही.
काय वाटतं? कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणाऱ्या करुण नायरला संधी न देत भारतीय टीम मॅनेजेंटने त्याच्यावर अन्याय केला आहे का? कमेंट करून नक्की कळवा.
