आयपीएलचा नवा सीझन कधी सुरू होईल याबद्दल क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. पण त्याहीपेक्षा जास्त सर्वांचे लक्ष लागून आहे. ते खेळाडूंच्या बोलीकडे!! यावर्षी कोणता खेळाडू कितीला विकला जातो आणि कोणता संघ कुठल्या खेळाडूला विकत घेतो यावर क्रिकेट शौकिनांच्या नजरा खिळून आहेत.
१२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएलचे मेगाऑक्शन आयोजित करण्यात आले आहे. मेगाऑक्शनमध्ये आयपीएल संघांना काही खेळाडू राखून ठेवता येतात. यावेळी प्रत्येक संघाला ४ खेळाडू राखून ठेवता येणार आहेत. यावेळी मात्र आयपीएलमध्ये दोन नवे संघ दाखल होत आहेत. हे आहेत लखनऊ आणि अहमदाबाद संघ. हे संघ सामील झाल्याने एकूण १० संघ लिलावात भाग घेणार आहेत.
यावेळी जगभरातील ५९० खेळाडू या लिलावात सहभागी होणार आहेत. त्यापैकी ३७० खेळाडू भारतीय आहेत, तर २२० खेळाडू परदेशी आहेत. यात ऑस्ट्रेलियाचे सर्वात जास्त म्हणजे ४७, वेस्टइंडिजचे ३४, दक्षिण आफ्रिकेचे ३३, श्रीलंकेचे २३, न्यूझीलँड आणि इंग्लंड प्रत्येकी २४, अफगाणिस्तानचे १७, आयर्लंड आणि बांगलादेश प्रत्येकी ५, नामिबियाचे ३, स्कॉटलँडचे २, नेपाल, झिम्बाब्वे आणि अमेरिकेचे प्रत्येकी १-१ खेळाडू आहेत.
या ५९० खेळाडूंपैकी २२८ खेळाडू कॅप्ड म्हणजेच आंतरराष्ट्रीय सामने खेळत असलेले, तर ३५६ अनकॅप्ड खेळाडू आहेत. तर सात खेळाडू हे सहकारी देशांचे आहेत. प्रत्येक खेळाडूची एक बेस प्राईस म्हणजे मूळ किंमत असते. या मूळ किंमतीपासून खेळाडूची बोली सुरू होते. एकूण ४८ खेळाडूंनी स्वतःची बेस प्राईस २ कोटी ठेवली आहे, तर २० खेळाडू १.५ कोटीवर आहेत. तर ३४ असे खेळाडूंची बेस प्राईस १ कोटी रुपये आहे.


