'एक नूर आदमी, दस नूर कपडा' हे तर सर्वांना मान्य आहेच. विविध प्रकारच्या कापडाचे ड्रेस आपण परिधान करत असतो. कॉटन, सिल्क, जॉर्जेट असे एक ना अनेक कपड्यांचे प्रकार आहेत. हवामानानुसार किंवा काही ठराविक दिवशी उठून दिसायला त्या त्या प्रकारचे कपडे घालणं सगळ्यांनाच आवडते. परंतु तुम्ही कधी पेपर ड्रेस किंवा कागदी कपड्यांविषयी ऐकले आहे काय? तुम्हाला थट्टा वाटेल पण कागदी ड्रेस खरोखर बनवले जायचे आणि एकेकाळी अमेरिकेत त्याची जोरदार फॅशन होती. आज याचविषयी आपण जाणून घेणार आहोत.
अमेरिकेतील स्कॉट पेपर कंपनीने १९६६ मध्ये एक मार्केटिंग स्टंट म्हणून कागदी कपड्यांची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली. यात महिलांचे कपडे फॅशन म्हणून सुरू झाली. शॉर्ट स्कर्ट, मिनी ड्रेस, स्कार्फ असे विविध कपडे कागदाचे बनवले गेले. हे महिलांचे कपडे डिस्पोजेबल सेल्युलोज फॅब्रिकपासून बनवले होते. अमेरिकेत असे कपडे नवे असल्याने त्यांच्याकडे कुतूहलाने पाहिले गेले आणि एक नवी फॅशन सुरू झाली. सेल्युलोज मटेरिअल "ड्युरा-वेव्ह" पासून बनवलेला ड्रेस मिळवण्यासाठी ग्राहकांना एक कूपन आणि $१.२५ देऊन ते कपडे मिळत असे. स्त्रियांना हे आवडू लागले आणि त्याचा खप होऊ लागला.





