भारतीय संघाचा युवा फलंदाज ईशान किशन (Ishan kishan) हा आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. गोलंदाज कोणीही असो ईशान किशन फलंदाजी करताना आपली आक्रमकता कमी करत नाही. आज ईशान किशन आपला २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १९ जुलै १९९८ रोजी पटनामध्ये झाला होता. टी -२० आणि वनडे क्रिकेटमध्ये तो सलामीला येऊन भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देत असतो. मुख्य बाब म्हणजे त्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी वनडे क्रिकेटमध्ये (Ishan kishan odi debut) पदार्पण केले होते. चला तर जाणून घेऊया ईशान किशनच्या वाढदिवशी त्याने केलेले काही खास विक्रम.
वाढदिवसाच्या दिवशी पदार्पण करणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू..
ईशान किशनने आपल्या २३ व्या वाढदिवशी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय ठरला होता. यापूर्वी गुरुशरण सिंगने भारतासाठी वाढदिवसाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ८ मार्च १९९० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र त्याला केवळ एकच सामना खेळता आला. तसं पाहायला गेलं तर, ईशान किशन हा वाढदिवसाच्या दिवशी पदार्पण करणारा १६ वा क्रिकेटपटू ठरला होता.
ईशान किशनने आतापर्यंत एकूण ३ वनडे सामने खेळले आहेत. ज्यात त्याला २९.३ च्या सरासरीने ८८ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक देखील झळकावले आहे. तसेच टी -२० क्रिकेटमध्ये ईशान किशनची बॅट नेहमीच आग उकळते. तो किती आक्रमक फलंदाज आहे,हे त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात दाखवून दिलं होतं. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ५६ धावांची खेळी केली होती. टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा ४६ वा फलंदाज ठरला होता.
ईशान किशनने आतापर्यंत एकूण १८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ५३२ धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ अर्धशतक झळकावले आहेत. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणं हे ईशान किशनला खूप चांगलं जमतं. त्यामुळे कुठल्याही गोलंदाजासाठी ईशान किशनला बाद करणं खूप कठीण जातं. अनेकदा त्याने आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाला विजय देखील मिळवून दिला आहे. आयपीएल स्पर्धेत तो मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत देखील सर्वांचे लक्ष ईशान किशनच्या कामगिरीवर असणार आहे.
