आऊटऑफ फॉर्म विराट, रोहित अन् रिषभवर भारी; टॉप १० फलंदाजांच्या यादीत केलाय प्रवेश ..

आऊटऑफ फॉर्म विराट, रोहित अन् रिषभवर भारी; टॉप १० फलंदाजांच्या यादीत केलाय प्रवेश ..

गेल्या १ दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडिया युजर्स आणि दिग्गजांचे म्हणणे आहे की, विराट कोहलीचा काळ आता संपला आहे. ज्या खेळाडूने भारतीय संघाला जल्लोष साजरा करण्याची संधी दिली, त्याच खेळाडूवर आता संघाबाहेर पडण्याची वेळ आली आहे. परंतु खरचं विराट कोहलीचा काळ संपला आहे का? खरचं त्याला संघाबाहेर केलं गेलं पाहिजे का? उत्तर असेल, नाही. कारण तो अजूनही भारतीय संघाचा सर्वोत्तम फलंदाज आहे. हे आम्ही नाही तर आतापर्यंतची आकडेवारी सांगतेय. चला तर पाहूया आकडेवारी.

२०२० नंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने २०२० नंतर तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. टी -२० क्रिकेटमध्ये त्याने ६६३, वनडे क्रिकेटमध्ये ७०२ तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ७६७ धावा केल्या आहेत. या तीनही फॉरमॅटमध्ये मिळून त्याने २२३७ धावा केल्या आहेत. तर रिषभ पंतने (Rishabh pant) २२१३ आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) २०३९ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या धावा ६० सामन्यांमध्ये केल्या आहेत. तर रोहित शर्माने ४७ आणि रिषभ पंतने ५४ सामन्यांमध्ये केल्या आहेत.

टॉप -१० खेळाडूंमध्ये सातव्या स्थानी..

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून ३५०८ धावा केल्या आहेत. तसेच विराट या यादीत ७ व्या क्रमांकावर आहे. तर रिषभ पंत ९ व्या आणि रोहित शर्मा १० व्या क्रमांकावर आहे. मात्र, रोहित आणि रिषभची सरासरी ही विराट कोहलीपेक्षा जास्त आहे. विराटने ३४.९५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर पंतची सरासरी ३९.०५ आहे.२०२० नंतर रोहित शर्माची सरासरी ३९.२१ आहे

का होतेय विराटला संघाबाहेर करण्याची मागणी ?

विराट कोहलीला २०१९ नंतर एकही शतक झळकावता आले नाहीये. विराट किती उत्कृष्ट फलंदाज आहे हे सर्वांना माहीत आहे, हेच कारण आहे की त्याच्याकडून नेहमी जास्तीची अपेक्षा केली जाते. २००८ पासून ते २०१९ पर्यंत त्याने ७० आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. तो सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग नंतर सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज आहे. त्यामुळे त्याची खालावलेली कामगिरी पाहता, त्याला संघाबाहेर करण्याच्या चर्चांना उधाण येत आहे.