खेळी एक विक्रम अनेक! दुहेरी शतक झळकावणाऱ्या ईशानने हे मोठे विक्रम केले आपल्या नावे..

खेळी एक विक्रम अनेक! दुहेरी शतक झळकावणाऱ्या ईशानने हे मोठे विक्रम केले आपल्या नावे..

बांगलादेश विरुध्द झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने (Ishan kishan) ऐतिहासिक खेळी केली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात दुहेरी शतकी खेळी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. ईशान किशनने अवघ्या १२६ चेंडूंमध्ये २०० धावा करण्याचा पराक्रम केला आहे. यादरम्यान त्याने ९ षटकार आणि २३ चौकार मारले आहेत. या ऐतिहासिक खेळीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

भारतीय क्रिकेट इतिहासात ईशान किशनच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी दुहेरी शतकी खेळी केली आहे. मात्र ईशान किशनच्या खेळीची खासियत अशी की, त्याने केवळ १२६ चेंडूंमध्ये हे दुहेरी शतक पूर्ण केले आहे. जे वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान दुहेरी शतक आहे. त्यानंतर तो १३१ चेंडूंमध्ये २१० धावा करून बाद झाला. या खेळी दरम्यान त्याने २४ चौकार आणि १० षटकार मारले.

वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान दुहेरी शतक..

ईशान किशनने अवघ्या १२६ चेंडूंमध्ये दुहेरी शतक करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. हे वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी चेंडूंमध्ये केलेले दुहेरी शतक आहे. त्याने वेस्ट इंडिज संघातील आक्रमक फलंदाज ख्रिस गेलचा सर्वात जलद दुहेरी शतक झळकावण्याचा विक्रम मोडून काढला आहे. ख्रिस गेलने १३८ चेंडूंमध्ये दुहेरी शतक झळकावले होते. 

वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सहावी सर्वात मोठी खेळी..

ईशान किशन हा वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी करणारा ६ वा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्माने २६४, मार्टिन गप्टील २३७, वीरेंद्र सेहवाग २१९, ख्रिस गेल २१५, फखर जमान याने नाबाद २१० धावांची खेळी केली होती.

या विक्रमांवर देखील कोरले आपले नाव..

ईशान किशन आता वनडे क्रिकेटमध्ये बांगलादेश संघाविरुद्ध सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावे होते. त्याने १७५ धावांची खेळी केली होती. तसेच तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावा करणारा फलंदाज देखील ठरला आहे.