कसोटी क्रिकेटची बॅजबॉल क्रांती!! भारतीय संघाने देखील इंग्लंडकडून या गोष्टी शिकायला हव्या...

कसोटी क्रिकेटची बॅजबॉल क्रांती!! भारतीय संघाने देखील इंग्लंडकडून या गोष्टी शिकायला हव्या...

इंग्लड संघ सध्या आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करत आहे. २०१९ वनडे विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर या संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे. नुकताच रावळपिंडीच्या खेळपट्टीवर इंग्लंड संघाने पाकिस्तान संघाची चांगलीच जिरवली आहे. इंग्लंड संघात या क्रांतीची सुरुवात २०१५ पासून झाली आहे. जेव्हा २०१५ वनडे विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेश संघाकडून पराभूत झाल्यामुळे इनलँड संघाला साखळी फेरीतून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर इंग्लंड संघाला आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्यात ओएन मॉर्गन आणि ट्रेव्हिस बेलीस यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. 

आता बेन स्टोक्स आणि जोस बटलर सारखे खेळाडू देखील याच आक्रमक रणनीतीचा वापर करत आहेत. सध्या इंग्लंड संघ टी-२० आणि वनडे फॉरमॅटमध्ये विश्वविजेते आहेत. इतकेच नव्हे तर कसोटी क्रिकेटमध्ये देखील ते आक्रमक क्रिकेट खेळत आहेत. जेव्हापासून बेन स्टोक्स हा इंग्लंडचा कर्णधार आणि ब्रेंडन मॅक्क्युलम हा इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे, तेव्हापासून इंग्लंड संघ कसोटी क्रिकेटमध्ये देखील आक्रमक क्रिकेट खेळत आहे. इंग्लंड संघाने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन संकल्पना आणली आहे. बॅजबॉल, अर्थात आक्रमक क्रिकेट खेळणं. याचा फायदा भारतीय संघाला देखील होऊ शकतो. याबाबत अधिक माहिती या लेखातून जाणून घेऊ. 

१) बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्क्युलम यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लंड संघ हा आक्रमक रणनीतीचा वापर करणारा पहिला संघ मुळीच नाहीये. यापूर्वी देखील अनेक संघांनी कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला आहे. ते संघ यशस्वी देखील ठरले आहेत. मात्र सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ५०० धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरलाय. भारतीय संघात देखील आक्रमक फलंदाज आहेत, जे कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक खेळी करून, भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत करू शकतात. त्यामुळे गोलंदाजांवरील दबाव कमी होऊ शकतो. 

) तुम्ही इंग्लंड संघाची प्लेइंग ११ पाहिली तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल की, इंग्लंड संघात अष्टपैलू खेळाडूंची संख्या वाढली आहे. इंग्लंड संघ सध्या अशाच खेळाडूंना प्राधान्य देत आहे, जे खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतात. भारतीय संघात देखील उत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत, मात्र हे खेळाडू आक्रमक क्रिकेट खेळण्यात अपयशी ठरतात. 

) फलंदाजानी आक्रमक क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला तर, ते बाद होण्याची शक्यता वाढते. मात्र याचा फायदा असा होती की, फलंदाज वेगवान गतीने धावा करतात. इंग्लंड संघ देखील बॅजबॉल म्हणजेच आक्रमक क्रिकेट खेळत आहे. बाद होण्याची भीती न बाळगता केवळ धावा करण्याचा प्रयत्न करत राहिल्याने गोलंदाज प्रेशरमध्ये येतात. तसेच धावांची गती देखील वाढते. त्यामुळे भारताला जर कसोटी क्रिकेटमध्ये क्रांती घडवायची असेल तर, बॅजबॉल रणनीतीचा वापर करावा लागेल. 

भारतीय संघाला आता बांग्लादेश आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघासोबत कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकांमध्ये ते या रणनीतीचा वापर करून पाहू शकतात.