टेनिस क्रिकेट खेळणारा उमरान मलिक अवघ्या ५ वर्षात कसा झाला वेगवान गोलंदाजीचा बादशहा? पाहा त्याचा प्रेरणादायी प्रवास

टेनिस क्रिकेट खेळणारा उमरान मलिक अवघ्या ५ वर्षात कसा झाला वेगवान गोलंदाजीचा बादशहा? पाहा त्याचा प्रेरणादायी प्रवास

आयपीएल २०२२ (ipl 2022) स्पर्धेत जर कुठल्या वेगवान गोलंदाजाने सर्वांना आश्चर्यचकित केलं असेल तर तो गोलंदाज म्हणजे उमरान मलिक (umran Malik). हेल्मेटच्या बाजूने चर्र आवाज करून जाणारे चेंडू, टप्पा पडताच काटा बदलणारे चेंडू आणि मुख्य बाब म्हणजे प्रत्येक चेंडू १५० पेक्षा अधिक गतीचा टाकण्यात उमरान मलिकचा हात कोणीच धरू शकत नाही. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात पदार्पण करत असलेल्या वेगवान गोलंदाजाकडून १५० पेक्षा अधिक गतीचा चेंडू पाहायला मिळणं जरा कठीणच असतं. परंतु या गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच सामन्यात ३ चेंडू १५० पेक्षा अधिक गतीने टाकले होते. उमरान मलिक हे नाव प्रत्येकाच्या तोंडावर आहे. परंतु तो कसा घडला हे फार कमी लोकांना माहित आहे. चला तर पाहूया त्याचा प्रवास.

जम्मू काश्मीरचा २२ वर्षीय गोलंदाज उमरान मलिक गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भन्नाट वेगवान गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याने गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू (१५३.३) टाकला होता. आयपीएल २०२१ स्पर्धेत तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा नेट गोलंदाज होता. त्यानंतर त्याला दुखापतग्रस्त असलेल्या टी नटराजनच्या जागी संधी मिळाली. संधी मिळताच त्याने संधीचे सोने करायला सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुध्द खेळताना हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला होता.

आपल्या वेगवान गोलंदाजीप्रमाणे त्याचा क्रिकेट कारकिर्दीला देखील वेगवान वळण लागले. २०१७ पर्यंत त्याने टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर नाव कमावलं होत,परंतु कधी लेदरचा चेंडू हातातही घेतला नव्हता. एकेदिवशी अब्दुल समदने आपले प्रशिक्षक रंधीर मन्हास यांना उमरान मलिकची गोलंदाजी पाहण्याची विनंती केली. त्यानंतर त्याने रंधीर मन्हास यांच्यासमोर नेट्समध्ये गोलंदाजी केली. त्याची गोलंदाजी पाहून रंधीर मन्हास देखील आश्चर्यचकित झाले होते. हीच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची पहिली पायरी ठरली. सुरुवातीला तो नियमित सराव करणं टाळायचा. परंतु त्यानंतर रंधीर मन्हास यांनी त्याला पटवून दिलं की, तो एक दिवस भारतीय संघासाठी नक्की खेळू शकतो. मग काय, रंधीर मन्हासच्या शब्दांचा आदर करत त्याने नियमित सराव करायला सुरुवात केली.

उमरान मलिकने मागून आणलेले शूज घालून जम्मू काश्मीरच्या १९ वर्षाखालील संघासाठी सुरू असलेल्या निवड चाचणीत सहभाग घेतला. त्याची गोलंदाजी पाहून त्याची निवड देखील झाली होती. परंतु विनू माकंड स्पर्धेत त्याला केवळ १ सामना खेळायची संधी मिळाली. पुढे २३ वर्षाखालील निवड चाचणीत त्याची निवड झाली नव्हती. परंतु त्याच नशीब पालटलं, २०१९-२० च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरचा सामना होता आसाम संघासोबत. या सामन्यापूर्वी आसाम संघाचे प्रशिक्षक आणि माजी भारतीय क्रिकेटपटू अजय रात्रा यांना काही नेट गोलंदाज हवे होते. उमरान मलिकला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. केवळ ४ चेंडू टाकल्यानंतर त्याला थांबवण्यात आलं. कारण होतं त्याचे वेगवान चेंडू.

उमरान मलिकची गोलंदाजी पाहून स्वतः अजय रात्रा यांनी जम्मू काश्मीर क्रिकेट बोर्डला, त्याला संघात घ्या असं म्हटलं होतं. तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने देखील त्याची गोलंदाजी पाहिली आणि त्याला जम्मू काश्मीर संघात स्थान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

उमरान मलिकने केवळ ५ वर्षांपूर्वीच लेदर चेंडूने गोलंदाजी करायला सुरुवात केली. इतक्या कमी वेळात १५० पेक्षा अधिकच्या गतीने गोलंदाजी करणं सोपी गोष्ट नाहीये. ही त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात आहे. इथून पुढे त्याच्या गोलंदाजीची धार आणखी तेज होऊ शकते. लवकरच तो भारतीय संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो.