क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अशा घटना घडतात, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. क्रिकेटपटू मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचे चौकार आणि षटकार मारून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी ते जीव ओतून टाकतात. मात्र बॅट आणि बॉलचा हा खेळ अनेकदा प्राणघातक ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला या लेखातून अशा ५ क्रिकेटपटूंबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांचा मृत्यू बॉल लागल्यामुळे झाला आहे.
१) फिलिप ह्यूज :
ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर फलंदाज फिलिप ह्यूजचा मृत्यू बॉल लागल्यामुळे झाला होता. साऊथ ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स या दोन्ही संघांमध्ये सामना सुरू असताना, शॉन अबॉटचा बाऊंसर चेंडू फिलिप ह्यूजच्या हेल्मेटला जाऊन धडकला होता. हेल्मेटच्या मागच्या बाजूला चेंडू लागताच, फिलिप ह्यूज मैदानावर चक्कर येऊन पडला होता. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र दोन दिवस झुंज दिल्यानंतर त्याला जीव गमवावा लागला होता.
२) रमन लांबा:
माजी भारतीय क्रिकेटपटू रमन लांबा यांना भारतीय संघासाठी ४ कसोटी आणि ३२ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली होती. दिल्लीच्या या खेळाडूला बांगलादेशमध्ये पार पडलेल्या क्लब क्रिकेटच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना दुखापत झाली होती. फॉरवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या ३८ वर्षीय रमन लांबा यांनी कधी विचारही केला नसेल की, त्यांच्यासोबत अशी एखादी घटना घडेल. दुखापतग्रस्त झाल्यानंतर ३ दिवस ते कोमात राहिले. मात्र त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८७७६ धावा केल्या होत्या.
३) जुल्फिकर भट्टी :
युवा पाकिस्तानी खेळाडू जुल्फिकर भट्टीला वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी हे जग सोडून जावं लागलं होतं. छातीला बॉल लागल्यामुळे जुल्फिकर भट्टीचा मृत्यू झाला होता. छातीला चेंडू लागताच त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.
४) रिचर्ड ब्युमॉन्ट:
इंग्लिश क्रिकेटपटू रिचर्ड ब्युमॉन्टने ज्या सामन्यात ५ गडी बाद केले, त्याच सामन्यात त्याला आपले प्राण गमवावे लागले होते. काउंटी चॅम्पियनशिप खेळत असलेल्या रिचर्ड ब्युमॉन्टला सामना सुरू असताना, हृदय विकाराचा झटका आला होता. ज्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले होते. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी तो केवळ ३३ वर्षांचा होता.
५) अब्दुल अजीज :
पाकिस्तान संघातील माजी खेळाडू अब्दुल अजीजचा मृत्यू देखील बॉल लागल्यामुळे झाला होता. फलंदाजी करत असताना बॉल त्याच्या छातीला लागला होता. एकवेळ असे वाटत होते की, त्याला बॉल लागल्याचा काही परिणाम झाला नाहीये. मात्र पुढील बॉलचा सामना करत असताना,तो खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
फिलिप ह्यूजचा (Phillip Hughes) मृत्यु २७ नोव्हेंबर रोजी झाला होता. तर आज ३० नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस आहे.
