क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात नवनवे विक्रम प्रस्थापित केले जात असतात. तसेच ते मोडले देखील जात असतात. कारण विक्रम हे मोडण्यासाठीच बनवले जात असतात. मात्र काही विक्रम असे असतात, जे क्रिकेट चाहते कधीच विसरू शकत नाही. तर काही विक्रम असे असतात की खेळाडूंना हवे असले तरी विसरता येत नाहीत. बोभाटाच्या किस्से क्रिकेटचे या भागात, आम्ही तुम्हाला क्रिकेट इतिहासातील ५ अशा रोमांचक घटनांबद्दल माहित देणार आहोत. जे क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाही.
१) जेव्हा आफ्रिदीने वापरली सचिन तेंडुलकरची बॅट ...
त्यावेळी शाहिद आफ्रिदीकडे फलंदाजी करण्यासाठी बॅट नव्हती. त्यामुळे वकार युनिसने शाहिद आफ्रिदीला फलंदाजी करण्यासाठी बॅट दिली होती. ती बॅट सचिन तेंडुलकरची होती. सचिन तेंडुलकरने ती बॅट वकार युनिसला भेट दिली होती. योगायोग असा की, त्याच बॅटने शाहिद आफ्रिदीने वनडे क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक झळकावले होते. त्याने अवघ्या ३७ चेंडूंमध्ये ११ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले होते.
२) जेव्हा सचिन तेंडुलकरने केले पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व..
ही बाब खूप कमी लोकांना माहित आहे की, सचिन तेंडुलकरने पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. होय, अनेकांना हे खोटं वाटेल मात्र ही गोष्ट १०० टक्के खरी आहे. १९८७ विश्वचषक स्पर्धेदरम्यान पार पडलेल्या सराव सामन्यात सचिन तेंडुलकर पाकिस्तान संघासाठी क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यावेळी त्याने भारतीय संघासाठी पदार्पण केले नव्हते.
३)एक शतकानंतर घडली पुन्हा तीच घटना..
१८७७ रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघामध्ये क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना पार पडला होता. हा ऐतिहासिक सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ४५ धावांनी विजय मिळवला होता. आता योगायोग असा की, १०० वर्षांनंतर म्हणजेच १९७७ रोजी जेव्हा पुन्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले. त्याच मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाने ४५ धावांनी विजय मिळवला होता.
४) एलन बॉर्डर यांची विक्रमी कारकीर्द..
ऑस्ट्रेलिया संघातील दिग्गज खेळाडू एलन बॉर्डर यांनी आपल्या कारकिर्दीत सलग १५३ सामने खेळून नवा इतिहास रचला होता. यादरम्यान ते दुखापतीमुळे किंवा निराशाजनक कामगिरी केल्यामूळे एकदाही संघाबाहेर झाले नव्हते.
५) भारतीय संघ या बाबतीत आहे नंबर १...
क्रिकेट इतिहासात भारतीय संघ असा एकमेव संघ आहे, ज्या संघाने मर्यादित षटकातील सर्व प्रकारच्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली आहे. भारतीय संघाचे दिग्गज कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ मध्ये झालेल्या ६० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळवले होते. त्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना, २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये झालेल्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजय मिळवला होता.
यापैकी तुमचा आवडता किस्सा कोणता? कमेंट करून नक्की कळवा .




