भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राजने ( Mithali Raj retirement) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिताली राजने गेल्या २३ वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटला बहुमूल्य योगदान दिले आहे. बुधवारी (८ जून) वयाच्या ३९ व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन दशकांहून अधिक काळ मिताली राजने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मिताली राजच्या नावावर आहे. तसेच कर्णधार म्हणून सर्वाधिक सामन्यांमध्ये विजय मिळवण्याचा विक्रम देखील मिताली राजच्या नावे आहे. त्यामुळे मिताली राजची निवृत्ती हे भारतीय महिला क्रिकेटचे एक मोठे नुकसान आहे.
मिताली राजने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली आहे. ज्यात तिने लिहिले की, "मी एक लहान मुलगी होते जेव्हा मी भारताची निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरले. हा प्रवास खूप मोठा होता, ज्यात मला खूप अनुभव आले. गेले २३ वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होते. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे."
Thank you for all your love & support over the years!
— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u
तसेच तिने पुढे लिहिले की, "जेव्हा मी मैदानात पाऊल टाकले, त्यावेळी मी नेहमीच काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला. संघाला विजय मिळवून देणं हेच माझं अंतिम धैय्य होतं. मला वाटते की, ही निवृत्ती जाहीर करण्याची योग्य वेळ आहे. आता भारतीय संघाची जबाबदारी युवा खेळाडूंवर आहे. मी बीसीसीआय, सचिव जय शाह आणि इतर अधिकाऱ्यांचे आभार मानते."
कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार.
मिताली राज (भारत)- एकूण सामने १५५, विजय ८९, पराभव ६३
सी. एडवर्ड्स (इंग्लंड)- एकूण सामने ११७, विजय ७२, पराभव ३८
बी. क्लार्क (ऑस्ट्रेलिया)- एकूण सामने १०१, विजय ८३, पराभव १७.
