इतिहासाला कलाटणी देणाऱ्या हत्या: मारेकरी ठरलेल्या शीख सुरक्षारक्षकांना काढण्याचा प्रस्ताव स्वतः इंदिरा गांधींनीच फेटाळला होता!!

लिस्टिकल
इतिहासाला कलाटणी देणाऱ्या हत्या: मारेकरी ठरलेल्या शीख सुरक्षारक्षकांना काढण्याचा प्रस्ताव स्वतः इंदिरा गांधींनीच फेटाळला होता!!

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' हे वाक्य 'आयर्न लेडी' अर्थात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना अगदी तंतोतंत लागू पडतं. वैयक्तिक आयुष्याबरोबरच त्यांच्या राजकीय आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. सुरुवातीच्या काळात 'गूंगी गुडिया' म्हणून ओळख निर्माण झालेल्या इंदिरा गांधी नंतर 'आयर्न लेडी' म्हणून नावारुपाला आल्या. त्यांनी घेतलेल्या अनेक धाडसी निर्णयांपैकी एका निर्णयाने त्यांचा मृत्यू ओढवला. तो कसा? त्यांच्या हत्येमुळे देशातील राजकारण कसं बदललं? नेमक असं काय घडलं त्या दिवशी? याची उत्तरं शोधणारा हा लेख.

स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीजींच्या निधनानंतर दिल्लीतील वेगाने फिरणाऱ्या राजकीय चक्राच्या गतीवर स्वार होत इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यांचा पंतप्रधान झाल्यानंतरचा प्रवास अनेक चढ-उतारांचा होता. सुरुवातीच्या काळात अबोल असल्यामुळे 'गुंगी गुडिया' म्हणून हेटाळणी झाली. पण इंदिरा गांधींना कमी लेखण्याची चूक अल्पावधीतच विरोधकांच्या लक्षात आली. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले. यात फक्त शहरांपुरत्या मर्यादित असणाऱ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांना सरकारकडून दिलं जाणारं वेतन बंद करणं, बांगलादेशची निर्मिती अशा अनेक निर्णयांचा समावेश होता.

विलीनीकरणाआधी देशातल्या बँका फक्त शहरांपुरत्या मर्यादित होत्या. त्यांच्या या निर्णयाला विरोध झाला परंतु त्यांनी हा विरोध मोडून काढत तब्बल दोन वेळा एकूण १४ बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं. राष्ट्रीयीकरणामुळे अनेक गावांमध्ये त्यांच्या शाखा सुरू झाल्या.

त्यांचा पुढचा मोठा निर्णय म्हणजे स्वातंत्र्यानंतर विलीन झालेल्या संस्थानांच्या संस्थानिकांना सरकारकडून दिलं जाणारं वेतन बंद करणं. त्याकाळी सुमारे चार हजार कोटी या वेतनापायी खर्च होत असत. संस्थानिकांचं वेतन रद्द केल्यामुळे हा सगळा पैसा सार्वजनिक उपक्रमांच्या विकासासाठी उपलब्ध झाला. त्यांच्या या निर्णयाला विरोधकांबरोबरच मोरारजी देसाईं सारख्या स्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांनीही विरोध दर्शवला, पण त्यांचा हा विरोध फार काळ तग धरू शकला नाही. त्यांच्या या निर्णयाविरोधात अनेकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तरीही संस्थानिकांचे तनखे रद्द झालेच.

१९७१ मध्ये बांगलादेशची केलेली निर्मिती हादेखील असाच एक धाडसी निर्णय. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अनेक पातळ्यांवरती त्यांना लढावं लागलं. पश्चिम विरुद्ध पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांगलादेश यांमधील लढाईदरम्यान अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने होती. इंदिरा गांधींनी अमेरिकन राजदूताला सकाळच्या चहापानाचं निमंत्रण दिलं. त्यावेळी सॅम माणेकशॉ यांनाही पाचारण केलं, पण त्यांना आमंत्रण देताना त्यांचा मिल्ट्रीचा युनिफॉर्म घालून येण्यास सांगितलं. पंतप्रधानांनी आपल्याला असं का सांगितलं हे त्यांना समजेना. नंतर अमेरिकन राजदुतास 'तुम्ही काहीतरी करा नाहीतर मला नाईलाजास्तव यांना कारवाई करण्याचे आदेश द्यावे लागतील' हे वाक्य त्या सॅम माणेकशॉ यांच्याकडे पाहात बोलल्या. हे वाक्य ऐकल्यानंतर युनिफॉर्ममध्ये बोलावण्याचं कारण माणेकशॉ यांना कळलं. मुक्ती वाहिनी सेना या नावाने स्थानिकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या बळावर पाकिस्तानला जेरीस आणलं. पाकिस्तानला संपूर्ण शरणागती स्वीकारायला लावून बांगलादेश या नव्या स्वतंत्र देशाची निर्मिती केली.

अशा अनेक कठीण प्रसंगातून तावून सुलाखून निघून इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाल्या. आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध झाल्या.

त्यांच्या आयुष्यात अजून एक वळण आलं- पंजाबमधला वाढता दहशतवाद. साधारण ऐंशीच्या दशकात पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी दहशतवाद जोरावर होता. जर्नलसिंग भिंद्रनवाले नामक युवकाची दहशत पंजाबात सर्वदूर होती. या भिंद्रनवालेने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातल्या मोठ्या तख्तावर कब्जा केला होता. धार्मिक दृष्टीनेही या तख्ताला महत्त्व आहे. कारण या तख्तावरूनच शिखांसाठीचे आदेश निघतात. स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीच्या काळात ब्रिटन, अमेरिका व इतर देशातील शीख लोकांनीही स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला समर्थन द्यायला सुरुवात केली.

त्यावेळी पंजाबमध्ये रात्रीच्या वेळी चालणाऱ्या बसेसवर दहशतवादी हल्ला करत. या हल्ल्यात हिंदू लोकांना लक्ष्य केलं जाई. हे इतकं वाढलं, की पंजाबमध्ये रात्रीच्या प्रवासी बसेसवर पंजाब सरकारने बंदी घातली. भिंद्रनवालेच्या लोकांचा धुमाकूळ पाहून शेवटी काही काळ पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. तरी दुसरीकडे भिंद्रनवालेशी चर्चेच्या माध्यमातून, सामंजस्याने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण तो प्रत्येक प्रस्ताव अमान्य करत होता. त्याने सुवर्ण मंदिरात लढाईसाठीची जय्यत तयारीही करून ठेवल्याचं आढळून आलं. मात्र हे नंतर मिळालेल्या शस्त्रास्त्रांमुळे कळून आलं.

त्याच्याशी चर्चेचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर हा दहशतवाद मोडून काढण्याचं पंतप्रधान इंदिरा गांधींनी ठरवलं आणि एक धाडसी निर्णय घेतला. या सर्व दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी पंजाबमध्ये लष्कर पाठवण्यात आलं. याचं नाव ठेवण्यात आलं 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'. लष्कराने सुवर्णमंदिर घेरलं आणि मंदिरातल्या लोकांना बाहेर पडण्याचं आवाहन केलं. पण काहीच लोक मंदिराबाहेर आले. आतमधल्या लोकांना बाहेर पडण्यापासून रोखण्याचं काम भिंद्रनवालेचे साथीदार करत असल्याचं बाहेर पडणाऱ्या लोकांकडून कळलं. थोड्या वेळातच धुमश्चक्रीला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार करण्यात आला. रात्रीसुद्धा त्यात खंड पडला नाही. अखेरीस सुवर्ण मंदिरात लपलेल्या सर्व दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आणि ब्लू स्टार ऑपरेशन समाप्त झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. हे ऑपरेशन सुरू होण्याआधी भिंद्रनवालेने पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्याने अवघ्या काही किलोमीटरवर सीमापार त्यांना संरक्षण मिळणार असल्याचं जाहीर केलं होतं! या पूर्ण ऑपरेशनच्या दरम्यान अनेक दुर्मिळ ग्रंथ नामशेष झाले. अकाल तख्ताचंही नुकसान झालं.

ऑपरेशन ब्ल्यू स्टार इंदिरा गांधींच्या हत्येचं कारण ठरलं!!

यानंतर काही दिवसांतच इंदिराजींची हत्या करण्यात आली. ऑपरेशन ब्लू स्टार नंतर त्यांच्या सुरक्षेत असलेल्या शीख सुरक्षारक्षकांना कमी करण्याचा प्रस्ताव समोर आला. पण 'माझा माझ्या शीख सुरक्षा रक्षकांवर पूर्णपणे विश्वास आहे. असं केलं तर तो त्यांचा अपमान असेल.' असं म्हणत त्यांनी तो नाकारला. शेवटी व्हायचं तेच झालं. सतवंत सिंग आणि बियांत सिंग या त्यांच्या विश्वासातील शिख सुरक्षारक्षकांनीच गोळ्या घालून त्यांची हत्या केली. कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार. त्यांच्या घरातून नेहमीच्या वाटेवर त्यांची हत्या करण्यात आली. सुरुवातीला नमस्कार स्वीकारून पुढे जात असतानाच बियांतसिंगनी हातातील पिस्तूल त्यांच्या रोखाने केलं. "ये क्या कर रहे हो?" या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून दिलं. त्यांच्या हत्येची बातमी समजताच दिल्लीमध्ये अनेक शिखांना मारण्यात आलं. शीख लोक रहात असलेल्या वस्त्यांवर हल्ले करण्यात आले. जवळपास तीन दिवस या हल्ल्यांनी दिल्ली धुमसत होती.

इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली. दिल्लीत घडत असलेल्या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी सैन्याला बोलवण्यात आलं. अधिकृत आकडेवारीनुसार एकट्या दिल्लीत तीन दिवसात हजारोंनी शीख मारले गेले. हे फक्त दिल्लीतच घडत नव्हतं, तर बोकारो, कानपूर या इतर शहरांमध्येही शीखांना लक्ष करून मारण्यात आलं. या सगळ्या घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारकडून दहा समित्या स्थापन केल्या गेल्या. माणूस एका वेळी सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. कोणी ना कोणी तरी व्यक्तीने घेतलेल्या निर्णयामुळे दुखावलं जातंच हेच यावरून सिद्ध होतं. नाही का?

स्मिता जोगळेकर