Birthday boy मोहम्मद शमीचे हे विक्रम मोडणं कुठल्याही गोलंदाजासाठी केवळ स्वप्नंच..

Birthday boy मोहम्मद शमीचे हे विक्रम मोडणं कुठल्याही गोलंदाजासाठी केवळ स्वप्नंच..

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad shami) आज (३ सप्टेंबर) आपला ३२ वा वाढदिवस साजरा करतोय. गेल्या काही वर्षांपासून तो भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. जसप्रीत बुमराह नंतर जर कोणी अनुभवी वेगवान गोलंदाज असेल तर, तो मोहम्मद शमी आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही तुम्हाला त्याने केलेल्या अशा काही विक्रमांबद्दल माहिती देणार आहोत, जे विक्रम मोडणं कुठल्याही गोलंदाजासाठी सोपं नसेल.

मोहम्मद शमीने वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना १५२ गडी बाद केले आहेत. तसेच या फॉरमॅटमध्ये त्याने अनेक मोठ मोठे विक्रम देखील आपल्या नावावर केले आहेत. मोहम्मद शमी हा भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० गडी बाद करणारा गोलंदाज आहे. अवघ्या ८० वनडे सामन्यांमध्ये त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला होता. तसेच वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना देखील त्याचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. मोहम्मद शमीने विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक घेण्याचा देखील पराक्रम केला आहे. 

मोहम्मद शमीने आतापर्यंत भारतीय संघासाठी ८२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १५२ गडी बाद केले आहेत. तसेच त्याने ९ वेळेस एकाच डावात ४-४ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. तसेच त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर, त्याने ११४ डावांमध्ये २१६ गडी बाद केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ६ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. तर टी -२० क्रिकेटमध्ये त्याने १८ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.

मुख्य बाब म्हणजे मोहम्मद शमी हा वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० गडी बाद करणारा भारतीय गोलंदाज आहे. त्याने केवळ ५६ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे. या यादीत भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानी आहे. बुमराहने ५७ सामन्यांमध्ये १०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. तर कुलदीप यादव या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. कुलदीपने ५७ सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

मोहम्मद शमीने २०१३ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. तेव्हापासून तो भारतीय संघासाठी मोलाची भूमिका पार पाडतोय. आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.