भारतीय संघाचा (Indian cricket team) वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा (Ishant Sharma) आज (२ सप्टेंबर) आपला ३४ वा वाढदिवस साजरा करतोय. तो भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना असो किंवा इंग्लंड विरुद्ध झालेली कसोटी मालिका, ईशांत शर्मा नेहमीच भारतीय संघासाठी संकटमोचक ठरला आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील अशा एका रोमांचक सामन्याबद्दल माहिती देणार आहोत, ज्या सामन्यात त्याने ७ गडी बाद करून भारतीय संघाला सामना जिंकून दिला होता. (ishant sharma birthday special)
ईशांत शर्मा वनडे आणि टी -२० क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेटमध्ये अधिक यशस्वी ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने अनेकदा महत्वाच्या स्पेल टाकल्या आहेत. भारतात आणि परदेशात देखील त्याच्या वेगवान गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. मात्र आज आम्ही ईशांत शर्माच्या अशा एका स्पेलबद्दल बोलणार आहोत, ज्या सामन्यात पराभवाच्या वाटेवर असलेल्या भारतीय संघाला त्याने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवून दिला होता.
तर झाले असे की, २०१४ (2014 india vs England lords test) मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २९५ धावा केल्या होत्या. यादरम्यान मध्यक्रमातील फलंदाज अजिंक्य रहाणेने तुफानी शतक झळकावले होते. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने पहिल्या डावात ३१९ धावा केल्या होत्या. यासह २४ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून मुरली विजयने ९५ धावांची खेळी केली होती. तर रवींद्र जडेजाने ६८ आणि भुवनेश्वर कुमारने ५२ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३४२ धावा केल्या होत्या.
ईशांत शर्माची निर्णायक स्पेल..
भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३१९ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने ४ गडी बाद १७० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. एक वेळ अशी आली होती जेव्हा असे वाटू लागले होते की, भारतीय संघ हा सामना गमावणार. मात्र त्यानंतर गोलंदाजीला आला ईशांत शर्मा. आपल्या वेगवान आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंनी त्याने इंग्लिश फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. १७० धावांवर ४ गडी बाद असलेल्या इंग्लंड संघाचा डाव अवघ्या २२३ धावांवर संपुष्टात आला होता. इंग्लंड संघाने शेवटचे ५ गडी केवळ ५० धावांच्या मोबदल्यात गमावले होते. ईशांत शर्माने या सामन्यात ७४ धावा खर्च करत ७ गडी बाद केले होते. या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
