आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा तोंडावर असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. मात्र आता भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे, कारण अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीचे (Mohammad shami) पुनरागमन झाले आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेल्या सराव सामन्यातील शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला आहे. भारतीय संघासाठी ही सकारात्मक बाब आहे. चला तर पाहूया मोहम्मद शमीची टी -२० क्रिकेटमधील कामगिरी.
मोहम्मद शमीची टी -२० क्रिकेटमधील कामगिरी..
मोहम्मद शमीने आयसीसी टी -२० विश्वचषक २०१४ स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातून टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत मोहम्मद शमीने एकूण १४ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ३१.५५ च्या सरासरीने १८ गडी बाद केले आहेत. शेवटच्या षटकांमध्ये तो भारतीय संघासाठी अप्रतिम गोलंदाजी करतो. त्याने शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करताना एकूण ११ गडी बाद केले आहेत.
टी -२० विश्वचषक स्पर्धेत अशी आहे मोहम्मद शमीची कामगिरी..
मोहम्मद शमीने आतापर्यंत टी -२० विश्वचषक स्पर्धेत एकूण ८ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने २८.३७ च्या सरासरीने आणि ८.७८ च्या इकोनॉमिने ८ गडी बाद केले आहेत. २०२१ मध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने अप्रतिम कामगिरी करत ६ गडी बाद केले होते. मात्र पाकिस्तान विरुध्द झालेल्या महत्वाच्या सामन्यात त्याने एकही गडी बाद न करता ४३ गडी बाद केले होते. तर न्यूझीलंड विरुध्द झालेल्या सामन्यात त्याने एकाच षटकात ११ धावा खर्च केल्या होत्या.
आयपीएल स्पर्धेत मोहम्मद शमीची कामगिरी..
३२ वर्षीय मोहम्मद शमी कडे आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स (२०११-१३), दिल्ली कॅपिटल्स (२०१४-१८), पंजाब किंग्ज (२०१९-२१) संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याला आयपीएल २०२२ स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाने ६.५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते.
आयपीएल स्पर्धेतील ९३ सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत एकूण २९.१९ च्या सरासरीने ९९ गडी बाद केले आहेत. यादरम्यान १५ धावा खर्च करत ३ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
