भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने रविवारी (१६ ऑक्टोबर) एमचेस रॅपिड ऑनलाइन स्पर्धेत पाच वेळेस विश्व बुद्धिबळ चॅम्पियन विजेत्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. यासह १६ वर्षीय गुकेशने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे. मात्र इतकी मोठी कामगिरी करणारा गुकेश आहे तरी कोण? चला जाणून घेऊया.
गुकेशने मोडला प्रज्ञानंदचा विक्रम...
गुकेशने केलेली कामगिरी ही विशेष कामगिरी आहे. कारण तो नॉर्वेचा दिग्गज खेळाडू मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे. त्याने वय वर्ष १६ वर्ष, ४ महिने आणि २० दिवस असताना हा ऐतिहासिक कारनामा केला आहे. त्याने ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचा विक्रम मोडून काढला आहे. आर प्रज्ञानंदने हा कारनामा वय वर्ष १६ वर्षे, ६ महिने आणि १० दिवस असताना हा कारनामा केला होता. आर प्रज्ञानंदने यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या मास्टर्स एअरथिंग स्पर्धेत केवळ ३९ चालींमध्ये मॅग्नस कार्लसनचा सुपडा साफ केला होता.
कार्लसनसारख्या दिग्गज ग्रँड मास्टरला पराभूत केल्यानंतर गुकेश म्हणाला की, "मॅग्नस कार्लसनला हरवणे हे नेहमीच खास असते."दरम्यान, तो पुढच्या फेरीत पोलंडचा ग्रँड मास्टर जॅन क्रिझिस्टोफ डुडाकडून ४२ चालींमध्ये पराभूत झाला.
आई - वडिलांसोबत खेळून केली सुरुवात...
गुकेशचे आई - वडील दोघेही डॉक्टर आहेत. त्याने आपल्या आई - वडिलांसोबत खेळून सुरुवात केली होती. त्याची खेळातील आवड पाहून, त्याला त्याच्या वडिलांनी समर कॅम्पमध्ये पाठवले होते. तिथे एमएस भास्कर त्यांचे प्रशिक्षक होते. २०१८ मध्ये त्याने पहिल्यांदा ग्रँड मास्टर स्पर्धा जिंकली होती.
भारताचा ५९ वा ग्रँड मास्टर बनला आहे गुकेश...
२०१८ मध्ये पहिला मान मिळवल्यानंतर गुकेशने मागे वळून पाहिले नाही. २०१९ मध्ये दिल्ली येथे झालेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याने तिसरे आणि अंतिम ग्रँडमास्टर विजेतेपद मिळवले होते. त्याने नवव्या फेरीत प्रतिस्पर्धी डीके शर्माचा पराभव केला आणि तो भारताचा ५९ वा ग्रँड मास्टर बनला. गुकेश अमेरिकेचा माजी ग्रँडमास्टर बॉबी फिशर आणि भारताचा विश्वनाथन आनंद यांना आपले आदर्श मानतो.
