हॅमिल्टनच्या मैदानावर न्यूझीलंड आणि नेदरलँड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने नेदरलँड संघावर ११५ धावांनी जोरदार विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने ५० षटकांच्या समाप्तीनंतर ३३३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड संघाचा संपूर्ण डाव ४२.३ षटकात २१८ धावांवर संपुष्टात आला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार विल यंग याला देण्यात आला. तसेच मालिकावीर पुरस्कार देखील विल यंगने पटकावला. ही मालिका न्यूझीलंड संघाने ३-० ने आपल्या नावावर केली. हा दिग्गज फलंदाज रॉस टेलरचा शेवटचा वनडे सामना होता.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु न्यूझीलंड संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. हेनरी निकोलस अवघ्या २ धावा करत माघारी परतला. त्यानंतर मार्टिन गप्टीलने १०६ तर विल यंगने १२० धावांचे योगदान दिले. या तुफानी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने ५० षटक अखेर ८ बाद ३३३ धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेदरलँड संघाकडून स्टीफन मायबर्गने सर्वाधिक ६४ धावांचे योगदान दिले. तर लोगन बिकने ३२ धावांचे योगदान दिले. शेवटी विक्रमजित सिंगने २५ धावांचे योगदान दिले. परंतु ही खेळी नेदरलँड संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. नेदरलँड संघाचा संपूर्ण डाव ४२.३ षटकात २१८ धावांवर संपुष्टात आला. हा सामना न्यूझीलंड संघाने ११५ धावांनी आपल्या नावावर केला.
