ऑलिंपिक्स सुरू होण्यापूर्वी यात सोहळ्यात असणार्या खेळांची माहिती वाचूया:
ऑलिंपिक २०१६: बोभाटा ऑलिंपिक गाइड भाग 2


बॉक्सिंग (Boxing)
गेल्या सलग दोन ऑलिंपिक्समध्ये पदके मिळाल्यापासून भारतात या क्रीडाप्रकाराला अधिक भाव तर मिळू लागला आहेच, पण, स्पर्धेत आणि अपेक्षेतही वाढ झाली आहे. गेल्यावेळेपासून महिला बॉक्सिंगचा समावेश केला गेला होता. या क्रीडाप्रकारामध्ये १३ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. स्त्रिया व पुरूष यांचे सामने विविध वजनी गटांत खेळले जातील. सदर स्पर्धा प्रत्येक वजनी गटात संपूर्णपणे नॉक-आऊट पद्धतीने खेळली जाईल. त्यातील सेमीफायनलचे विजेते सुवर्णपदकासाठी खेळतील तर सेमी फायनलमध्ये पराभूत झालेले ब्रॉन्झ पदकासाठी खेळातील.
स्पर्धा कधी होणारः
सगळ्या प्रकारच्या स्पर्धा ६ जुलैपासून सुरू होतील. वेगवेगळ्या गटातील स्पर्धा २१ ऑगस्टपर्यंत चालतील.
यावेळी भारताकडून कोण?
गेल्या वेळी लंडन ऑलिंपिक्सना भारताकडून तब्बल ८ खेळाडू पात्र ठरले होते. त्या तुलनेत यावेळी केवळ ३ खेळाडू या स्पर्धेसाठी क्वालिफाय होऊ शकले. गेल्यावेळी मेरी कोम खेळत होती. यावेळी महिलांमधून कोणीही पात्र ठरलेले नाही.
५६ किलो: शिव शापा
६४ किलो: मनोज कुमार
७५ किलो: विकास यादव
यावेळी भारताला पदकाची आशा?
या वेळी गेल्यावेळेप्रमाणे भारताला पदकाची आशा करता येणे कठीण आहे. केवळ तीन स्पर्धक क्वालिफाय झालेत. त्यात विकास यादवचा गट बदलला आहे. तरी क्वालिफाय झालेले खेळाडू बर्यापैकी फॉर्मात असल्याने किमान एखादे ब्रॉन्झ येईल असा आमचा अंदाज आहे.

कनोईंग (Canoe Slalom आणि Canoe sprint)
यात दोन प्रकारचे खेळ असतात
कनोई स्लालोमः Canoe Slalom स्पर्धांमध्ये शुभ्र फेसाळत्या-खळाळत्या (White Water) पाण्यामध्ये कनोईंग केले जाते - शर्यत होते. यात २५ दरवाजे पार करायचे असतात. लाल दारे प्रवाहाविरुद्ध तर हिरवी दारे प्रवाहाच्या सोबतीने पार केली जातात. जर दाराला स्पर्श झाला तर पेनल्टी म्हणून एकूण वेळेत दर स्पर्श झालेल्या दारामागे दोन मिनिटे वाढवली जातात. एकूण सेकंदातला वेळ + पेनल्टी मिळून अंतिम वेळ ठरते. कमीतकमी वेळ लागेल तो विजेता.
या स्पर्धेमध्ये एकूण चार सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. यात कनोई आणि कयाक हे दोन्ही प्रकार खेळले जातात. कनोईंग मध्ये एकेरी व दुहेरी स्पर्धा होतात. तर कयाकिंग मध्ये पुरुष व महिलांच्या एकेरी स्पर्धा होतात.
कनोई स्प्रिन्ट Canoe Sprint स्पर्धांमध्ये शुभ्र फेसाळ पाण्याऐवजी शांत पाण्यात स्पर्धा घेतल्या जातात. शिवाय इथे वेळ हा निकष नसून 'हेड-टु-हेड' स्पर्धा होतात. ऑलिंपिकमध्ये स्पर्धकांना दोन गटांत विभागले जाईल. त्यातील टॉप २ सेमी फायनलला भिडतील. सेमीच्या विजेत्या दोन खेळाडूंमध्ये सुवर्ण पदकाचा तर सेमी फायनलला हरलेल्या खेळाडूंमध्ये ब्रॉन्झ पदकाचा सामना होईल.
या स्पर्धेमध्ये एकूण १२ पदके पणाला लागलेली असतील. यात कनोई आणि कयाक हे दोन्ही प्रकार खेळले जातील. पुरुषांचे कयाकिंगचे एकेरी व दुहेरी १००० मी व २०० मी चे सामने, चार जणांचे १००० मीचा सांघिक सामना, कनोईंगचे १००० मीचे एकेरी दुहेरी सामने, २००मीचा एकेरी सामना, महिलांचे कयाकिंगचे एकेरी व दुहेरी ५०० मी, एकेरी २०० मी व सांघिक ५००मीचे सामने खेळवले जातील.
यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही
यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

सायकलिंग (Cycling BMX, Mountain bike, Road, Track)
सायकलिंग - BMX बी.एम्.एक्स. अर्थात बायसिकल मोटो क्रॉस! या स्पर्धाप्रकारामध्ये उंचवटे-खड्डे असलेल्या दगड-मातीच्या ट्रॅकवर सायकलिंग केले जाते. या स्पर्धांसाठी वापरल्या जाणार्या सायकलींना एकच गियर आणि एकच ब्रेक असतो. खड्यांपुढे टिकाव लागवा या दृष्टीने सायकली अत्यंत मजबूत असतात. चाकेही नेहमीच्या चाकांपेक्षा आकाराने लहान असतात.
या स्पर्धेमध्ये एकूण दोन सुवर्णपदके पणाला लागलेली असतील- महिला व पुरुष गटात प्रत्येकी एक. यात आधी क्रमवारी ठरवण्यासाठी पहिली राउंड होईल आणि मग मामला फायनलपर्यंत हेड-टु-हेड (वेळेनुसार) खेळला जाईल.
माऊंटन बाइक Cycling: Mountain Bike या क्रीडाप्रकारात डोंगराळ-खडकाळ भागात स्पर्धा होईल. साधारण दीड तास चालणार्या या स्पर्धेचे स्वरूप 'रेसिंग' सारखे असेल. जागतिक क्रमवारीनुसार 'स्टार्ट लाईन' वरून ही शर्यत सुरू होईल व 'अंतिम रेषा' जो पहिला ओलांडेल तो विजयी ठरेल.
यात स्पर्धकांना स्वतःची सायकल दुरुस्त करावी लागते. केवळ विवक्षित ठिकाणीच टेक्निकल पिट-स्टॉप्स असतात. याव्यतिरिक्त अत्यंत प्रेक्षणीय स्पर्धेची कॉमेंट्री रोचक असते. त्यात तुम्हाला हे जार्गन्स ऐकायला मिळतील (ऐनवेळी अडायला नको म्हणून इथे देतोय ;))
फुल सस(Full sus): पुढे आणि मागे सस्पेन्शन असणारी बाइक
हार्ड टेल (Hardtail): मागील सस्पेन्शन नसणारी बाइक
किक्-आऊट (Kick-out): शार्प वळण घेतेवेळी मागचे चाक एकाबाजुला झपकन् वळवायचे तंत्र
पिंच फ्लॅट (Pinch flat): एखाद्या कठीण वस्तूवर टायर इतक्या जोरात आदळणे की त्याच्या आतल्या ट्यूबचाही चुराडा होणे
या स्पर्धेमध्ये एकूण २ पदके पणाला लागलेली असतील - महिला व पुरुष
रोड सायकलिंग या स्पर्धाप्रकारामध्ये सपाट रस्त्यावर सायकलिंगची शर्यत घेतली जाते. या पारंपरिक शर्यती खुल्या रस्त्यांवर होतील. 'रोड रेस' प्रकारात सर्व स्पर्धक एकत्र सुरू करतील व पहिला आलेला विजेता होईल. तर 'टाइम ट्रॅप' प्रकारात लहान रस्त्यांवर कमीत कमी वेळ देणारा विजेता असेल. या दोन्ही स्पर्धा पुरुष व महिला गटांत खेळवल्या जातील अर्थात चार सुवर्णपदके पणाला असतील.
ही स्पर्धा बघताना काही जार्गन्स कानावर येतील ते असे:
लीड-आऊट (Lead-out) – एखादा स्वाराने आपल्या गटाच्या नेत्याला शर्यतीच्या शेवटी आपणहून वाट करून देणे
पेलोटॉन (Peloton) – महत्त्वाच्या स्वारांचा गट
ट्रॅक रोड सायकलिंग या स्पर्धाप्रकारामध्ये सपाट खुल्या रस्त्याऐवजी बांधलेल्या ट्रॅकवर सायकलिंगची शर्यत घेतली जाते. या प्रकारात गट पाडले जातील व प्रत्येक गट एकत्र सुरू करतील व पहिले काही पुढील फेरीसाठी पात्र होतील. फायनल स्पर्धेतील पहिले तीन पदके जिंकतील. या दोन्ही स्पर्धा पुरुष व महिला गटांत वेगवेगळ्या अंतरांसाठी खेळवल्या जातील.
यात तुम्हाला सर्वाधिक जार्गन ऐकायला लागेल ते म्हणजे गियर रेशो(Gear ratio): पुढच्या चेयरिंग मधले कॉग्स भागिले मागच्या चेयरिंग मधले कॉग्स.
या क्रीडाप्रकारात सर्व शर्यती मिळून तब्बल ११ सुवर्णपदके पणाला असतील.
यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही
यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

सुर मारणे (Diving)
खरं तर सूर मारण्याचा खेळ अनेक जण अनेकदा खेळत असतात पण एक क्रीडाप्रकार म्हणून तो भारतात फारसा प्रचलित नाही. मात्र तब्बल ८ सुवर्णपदके मिळवून देणार्या या खेळाला जलक्रीडेमध्ये मोठे स्थान आहे.
यात पुढील चार प्रकारात स्पर्धा होते (महिला आणि पुरूष)
३मी स्प्रिंगबोर्ड, १०मी प्लॅटफॉर्म, सिंक्रोनाईज्ड ३मी स्प्रिंगबोर्ड, सिंक्रोनाईज्ड १०मी प्लॅटफॉर्म,
मारण्यात येणारा सूर चार भागात विभागला असतो: सुरवातीची पोझिशन, टेक-ऑफ, सूर आणि पाण्यातील प्रवेश. आणि जजेस या प्रत्येक विभागावरून गुणांकन देतात. जरी स्पर्धक प्रत्येक भागाला प्रचंड महत्त्व देतो व त्यात अचूकता साधायचा प्रयत्न करतो, सर्वाधिक महत्त्व पाण्यात शिरण्याला असते. शक्य तितके उभे (वर्टीकल) आणि कमीत कमी पाणी उडवत शिरण्याचा प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असतो. जर तुम्ही अगदी नाममात्र पाणी उडालेले पाहिलेत तर अधिक गुणांची खात्री बाळगा. प्रत्येक प्रकारात काही कसोट्यांवर काठिण्यपातळी ठरते. जजने दिलेल्या गुणांच्या सरासरीला काठिण्यपातळीने गुणले जाते. सिंक्रोनाईज्ड प्रकारात जोडीने तारतम्याने सुर मारायचा असतो. त्यांच्यातील तारतम्याला खूप गुण असतात.
काही जार्गन्सः
आर्मस्टँड (Armstand): प्लॅटफॉर्म प्रकारातील असा सूर जो हातांपासून सुरू होतो
प्लॅटफॉर्म (Platform): हा एक स्थायी (fixed) डायविंग बोर्ड असतो. हा किमान ६मी लांब आणि ३मी रुंद असतो. ऑलिंपिकमध्ये हा पाण्यापासून १०मी उंचावर असतो
पाईक (Pike): अशी डायविंग पोझिशन ज्यासाठी डायवर आपले शरीर कमरेत वाकवतो, मात्र पाय सरळ ठेवतो.
यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही
यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

घोडेस्वारी (Equestrian)
या क्रीडाप्रकारात तीन उपप्रकार असतीलः ड्रेसेज, एव्हेन्टिंग आणि जम्पिंग. तीनही स्पर्धा वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात खेळवल्या जातील. अर्थात ६ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील.
यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही
यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

तलवारबाजी (Fencing)
या क्रीडाप्रकारात तीन उपप्रकार असतीलः फॉईल, एपी आणि साब्रे (Foil, Epée, Sabre). यातील फॉईल व साब्रे प्रकारात महिला व पुरुष गटांत वैयक्तिक व सांघिक स्पर्शा खेळवल्या जातात तर एपी प्रकारात दोन्ही गटात केवळ वैयक्तिक स्पर्धा होतात. म्हणजे या प्रकारातही तब्बल १० सुवर्णपदके मिळण्याची शक्यता असते.
हे प्रकार अर्थातच तलवारीच्या प्रकारावरून आले आहे. यापैकी फॉईल आणि त्याहून जराशी जड असणाऱ्या एपी प्रकारात तलवारीचे टोक समोरच्याला स्पर्श करून पॉइंट कमावला जातो. तर साब्रेमध्ये सामान्यतः तलवारीची धार वापरली जाते. 'एपी'मध्ये दोन्ही तलवारबाजांना एकावेळी गुण मिळू शकतात, अन्य प्रकारात एक गुण मिळाल्यानंतर पुन्हा दूर जावे लागते व एकावेळी एकच प्रतिस्पर्धी गुण मिळवू शकतो. एक सेट ३ मिनिटे किंवा एकाच स्पर्धकाविरुद्ध १५ वार होईपर्यंत चालतो. असे तीन सेट खेळले जातात.
यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही
यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

हॉकी (Field Hockey)
एकेकाळी भारताला हुकमी सुवर्णपदक मिळवून देणार्या व भारताचा राष्ट्रीय खेळ असणार्या हॉकीविषयी, त्याच्या नियमांविषयी वगैरे अधिक लिहायची आवश्यकता नाही. यातही विविध खंडांतील स्पर्धांमधून पात्रता मिळते. जसे भारत पुरुष संघ आशिया कपच्या विजनमुळे थेट पात्र झाला. तर महिला संघाला मात्र खास पात्रता लढती खेळून पात्र व्हावे लागले आहे. यावेळी पहिल्यांदाच दोन्ही पुरुष व महिला संघ पात्र ठरले आहेत .तर पहिल्यांदाच पाकिस्तानचा कोणताही संघ पात्र ठरू शकलेला नाही
पुरुषांची व महिलांची स्पर्धा दोन-दोन गटात खेळवली जाईलः
पुरुषः
गट अ: ऑस्ट्रेलिया, बेल्जियम,ब्राझिल, ग्रेत ब्रिटन, स्पेन,न्यूझीलंड
गट बः अर्जेंटिना, कॅनडा, जर्मनी, भारत, नेदरलँड्स, आयर्लंड
महिला
गट अ: चीन, जर्मनी, नेदरलँड्स,न्यूझीलंड, साउथ कोरिया, स्पेन
गट ब: अर्जेंटिना,ऑस्ट्रेलिया,ग्रेट ब्रिटन,भारत, जपान, अमेरिका
या प्रकारात १ स्त्रियांचे व १ पुरुषांचे सुवर्णपदक पणाला असेल
यावेळी भारताकडून कोण?
भारताचा पुरुष व महिला असे दोन्ही संघ यावेळी पात्र आहेत.
यावेळी भारताला पदकाची आशा?
भारतीय हॉकी हळू हळू बहरत आहे. भारताकडे पदक जिंकण्याची क्षमता कागदावर तरी दिसत नसली तरी मोठा चमत्कार करण्याची क्षमता भारताकडे आहे. आम्ही पुरुष हॉकीत किमान ब्रॉन्झ पदकाची अपेक्षा करत आहोत.