ऑलिंपिक २०१६: बोभाटा ऑलिंपिक गाइड भाग १

लिस्टिकल
ऑलिंपिक २०१६: बोभाटा ऑलिंपिक गाइड  भाग १

बोभाटाच्या ऑलिंपिक सफरीत तुमचं स्वागत आहे. ब्राझीलच्या प्रसिद्ध "रिओ डि जेनेरो" या शहरात यंदा ५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक्सचे खेळ होणार आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या पंढरीच्या वारीत तुम्ही बोभाटासह सहभागी झालात. आता दर चार वर्षांनी जगभरांच्या क्रीडाभक्तांच्या या वारीतही एकत्रच सहभागी होऊया.

आता ३-४ ऑगस्टपासून काय होईल? जसजसा ऑलिंपिक्सला रंग चढेल,तसतसे चार वर्षात कधी न ऐकलेले खेळ टिव्हीवर चालू दिसतील. एरवी सचिन, विराटच्याऐवजी दुसरा शब्दही न काढणारे भक्त अचानक बोम्बायला देवी, ज्वाला गट्टा किंवा गगन नारंगबद्दल गप्पा मारू लागतील आणि  तुम्हाला यातलं काहीच माहीत नसेल?

छे छे! बोभाटाचे वाचक असे अनभिज्ञ कसे राहतील? तर घेऊन येतोय ऑलिंपिक खेळांचा क्रॅश कोर्स. ऑलिंपिक्स सुरू होण्यापूर्वी यात सोहळ्यात असणार्‍या खेळांची माहिती वाचूया:

तिरंदाजी(Archery)

तिरंदाजी(Archery)

या स्पर्धेमध्ये एकूण चार सुवर्णपदके पणाला लागलेली असतात. दोन पुरुष गटात तर महिला गटात दोन पदके मिळतात. यामध्ये पुरुष व स्त्रियांची एकेरी स्पर्धा व सांघिक स्पर्धा यांचाही समावेश आहे.

एकेरी स्पर्धा: यात सर्वप्रथम 'रँकिंग फेरी' होईल. या फेरीचा उपयोग ६४ खेळाडूंची १ ते ६४ अशी क्रमवारी लावण्यासाठी करण्यात येतील. त्या नंतरच्या राऊंडसमधे पहिल्या रॅंकचा खेळाडू ६४व्या रॅंकच्या खेळाडूबरोबर भिडेल. त्याच प्रकारे २रा ६३ व्या बरोबर .. असे करत करत 'एलिमिनेशन' पद्धतीने शेवटच्या दोन खेळाडूंमध्ये सुवर्ण पदकाचा तर सेमी फायनलला हरलेल्या खेळाडूंमध्ये ब्रॉन्झ पदकाचा सामना होईल. स्पर्धेच्या एका सेटमध्ये तीन बाण मारावे लागतील. अशा पाच सेटच्या गुणांच्या बेरजेवरून विजेता ठरेल.

सांघिक स्पर्धा: यात एका संघात तीन खेळाडू असतील. यात सर्वप्रथम 'रँकिंग फेरी' होईल. या फेरीचा उपयोग १६ संघांची १ ते १६ अशी क्रमवारी लावण्यासाठी करण्यात येईल. त्या नंतरच्या राऊंडसमधे पहिल्या गुणांकनाचा संघ ६४व्या गुणांकनाच्या संघाबरोबर भिडेल. त्याच प्रकारे २रा १५ व्या बरोबर .. असे करत करत 'एलिमिनेशन' पद्धतीने शेवटच्या दोन संघामध्ये सुवर्ण पदकाचा तर सेमी फायनलला हरलेल्या संघामध्ये ब्रॉन्झ पदकाचा सामना होईल.

स्पर्धेच्या एका सेटमध्ये सहा बाण (प्रत्येकी दोन) मारावे लागतील. अशा चार सेटच्या गुणांकनाच्या बेरजेवरून विजेता ठरेल. जर समान गुण झाले तर तीन बाणांचा (प्रत्येकी एक) 'शूट-ऑफ' खेळवला जाईल. त्यातही निर्णय न झाल्यास, डार्ट बोर्डवरच्या मध्याच्या सर्वात अचूक वेध घेणारा संघ विजेता ठरेल.

स्पर्धा कुठे होणार?: ही स्पर्धा 'सम्बाड्रोम' या एरवी कार्निवलसाठी प्रसिद्ध असणार्‍या स्टेडियममध्ये होईल.

स्पर्धा कधी होणारः एकेरी स्पर्धा ५ऑगस्ट सुरू होतील. महिलांची अंतिम फेरी ११ ऑगस्ट तर पुरुषांची १२ ऑगस्टला खेळवली जाईल. सांघिक स्पर्धा पुरुष व महिलांच्या अनुक्रमे ६ व ७ ऑगस्ट रोजी सुरू होतील आणि त्याच दिवशी त्यांचा निकालही लावला जाईल.

यावेळी भारताकडून कोण-कोण खेळणार?

पुरुष एकेरी: गेल्या वेळी यात तीन स्पर्धक क्वालिफाय झाले होते. यंदा मात्र केवळ अतानू दास हा एकटाच यात उतरेल.

महिला एकेरी व सांघिक: बोम्बायला देवी (दोन ऑलिंपिक्सचा अनुभव), दीपिका कुमारी (राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण व आशियाई स्पर्धेत ब्रॉन्झ), लक्ष्मीराणी मांझी तिघी सांघिक स्पर्धेत समाविष्ट असतील.

यावेळी भारताला पदकाची आशा? दीपिका नि बोम्बायला दोघीही बर्‍याच अनुभवी खेळाडू आहेत. पैकी दीपिका सध्या जगात पाचव्या रँकची खेळाडू आहे. तिच्याकडून फार तर ब्रॉन्झ पदकाची अपेक्षा करता येईल.

अॅथलेटिक्स(Athletics)

अॅथलेटिक्स(Athletics)

या स्पर्धेमध्ये तब्बल ४७ सुवर्णपदके पणाला लागणार अहेत.  यापैकी २४ ट्रॅकवर, १६ 'फील्ड'वर, दोन संयुक्त ठिकाणी तर पाच रस्त्यांवर होणाऱ्या स्पर्धेतून ठरतील. ऑलिंपिकचे घोषवाक्य Citius, Altius, Fortius’ (‘अधिक वेगात, अधिक उंचावर, अधिक ताकदीने’) सार्थ ठरवणाऱ्या या क्रीडाप्रकारात चालण्यापासून मॅरॅथॉनपर्यंत सारे खेळ आहेत. घाबरु नका, यातील प्रत्येक खेळाची माहिती इथे देत नाही आहोत.

त्या-त्या स्पर्धा चालू असताना त्याबद्दल बोलूच. ऑलिंपिकमधला सर्वात जास्त पदके मिळवून देऊ शकणाऱ्या या प्रकारात साधारण दोन हजार खेळाडू भाग घेणार आहेत. मात्र भारतातर्फे फक्त ३६ खेळाडू क्वालिफाय होऊ शकलेत. आणि गंमत म्हणजे हा आजवरचा या प्रकारातला सर्वात मोठा आकडा आहे.

स्पर्धा कुठे होणार?: दरवेळेप्रमाणे खास ऑलिंपिकसाठी बांधलेल्या 'ऑलिंपिक स्टेडीयम'मुख्य स्टेडियममध्ये या स्पर्धा होतील. मेरेथॉनसारख्या स्पर्धा रियोमध्ये अन्यत्र सुरू होतील पण त्यांचा निकाल या मैदानावर लागेल. सदर मैदान यासाठी सज्ज झाले आहे.

स्पर्धा कधी होणारः १२ ऑगस्टपासून या महासोहळ्याला सुरवात होईल. तेव्हापासून ते ऑलिंपिकचे शेवटचे पदक २१ ऑगस्टला याच क्रीडाप्रकाराचे (पुरुष मॅरेथॉन स्पर्धेचे) असेल तोवर ही स्पर्धा चालू असेल.

यावेळी भारताकडून कोण?

भारत या स्पर्धांमध्ये कधीच एकही पदक मिळवू शकलेला नाही. यावेळी तब्बल ३६ अॅथलिटस ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत (गेल्यावेळी तर केवळ १३ खेळाडू पात्र ठरले होते)

पुरुषः

५० किमी चालणे: संदीप कुमार

२० किमी चालणे: मनिष रावत, गुरमित सिंग, गणपती कृष्णन

पुरुष मॅरेथॉन: नितेन्द्र रावत, गोपी थोनाकल, खेताराम 

थाळी फेक: विकास गौडा (४थे ऑलिंपक क्वालिफिकेशन, आशियाई ब्रॉन्झ, राष्ट्रकुल रौप्य, जागतिक स्पर्धा ७वा, अथेन्स १४वा, बीजिंग २२वा, लंडन ८वा, राष्ट्रकुल सुवर्ण)

गोळाफेकः इंदरजीत सिंग

ट्रिपल जम्पः रणजित महेश्वरी (राष्ट्रकुल ब्रॉन्झ, आशियायी सुवर्ण)

२००मी धावणे: धरमवीर

४००मी धावणे: मुहमद याहिया

४ X ४००मी रीले: अरोकिया राजू, कुन्हू मुहम्मद, धरुण, मोहनकुमार, ललित माथूर, मुहमद याहिया

८०० मी धावणे: जीन्सन जॉन्सन

लांब उडी: अंकित शर्मा

महिला:

१००मी धावणे: दुत्ती चंद

२०० मी धावणे: श्रावणी नंदा

४०० मी धावणे: निर्मला

८००मी धावणे: टिन्टू लुका (पीटी उषाची विद्यार्थिनी, आशियाई ब्रॉन्झ, गेल्या ऑलिंपिकला सेमी फायनल पर्यंत मजल, गेल्या आशियायी स्पर्धेत सुवर्ण)

३००० मी अडथळा शर्यत: सुधा सिंग (दुसरे ऑलिंपिक्स - आशियाई सुवर्ण, रौप्य), ललित बाबर

थाळी फेक: सीमा अन्टील (तिसरे ऑलिंपिक्स - गेल्यावेळी १३व्या व १४व्यास्थानावर)

गोळाफेकः मनप्रीत कौर

ट्रिपल जम्पः रणजित महेश्वरी (राष्ट्रकुल ब्रॉन्झ), मयुखा जॉनी

४ ४००मी रीले: पुव्वम्म, अनिल्डा, जीस्ना मॅथ्यु, अश्विनी अकुन्जी, देबश्री मजुमदार, निर्मला

यावेळी भारताला पदकाची आशा? शक्यता जवळजवळ नाहीच, मात्र इतक्या मोठ्या संख्येने भारतीय अ‍ॅथलिट्सने क्वालिफाय होणे ही आनंदाची गोष्ट आहे.  विकास गौडा, टिन्टू लुका हे अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतात.

बॅडमिंटन

बॅडमिंटन

या स्पर्धेमध्ये ५ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. स्त्रिया व पुरूष यांच्या एकेरी व दुहेरी स्पर्धा आणि मिश्र दुहेरी स्पर्धा या क्रीडाप्रकारात खेळल्या जातील. सर्व प्रकारांत स्पर्धकांना ग्रुप्समध्ये विभागले जाईल. या ग्रुप्समधल्या प्रत्येक खेळाडूला ग्रुपमधील इतर प्रत्येक खेळाडूबरोबर खेळावे लागेल. यातील अव्वल १६ खेळाडू नॉक-आऊट पद्धतीने खेळतील. शेवटचे दोन विजेते सुवर्णपदका साठी खेळतील तर सेमीफायनलमध्ये पराभूत झालेले ब्रॉन्झ मेडलसाठी खेळतील.

स्पर्धा कधी होणारः सगळ्या प्रकारच्या स्पर्धा ११ ऑगस्ट सुरू होतील. १७ ऑगस्टला मिश्र दुहेरी, १८ ऑगस्टला महिला दुहेरी १९ऑगस्टला महिला एकेरी आणि २० ऑगस्टला पुरूष (एकेरी व दुहेरी) निकाल लागतील.

लंडन ऑलिंपिकचे निकालः चीन आणि आशियाई अतिपूर्वेच्या खेळाडूंचा दबदबा असणाऱ्या या खेळात गेली स्पर्धा अपवाद ठरली. भारताच्या सायना नेहवालने यात ब्रॉन्झ पदक पटकावले होते.

यावेळी भारताकडून कोण?

अख्ख्या भारताचे यावेळी या स्पर्धांकडे लक्ष लागले असेल. लंडन ऑलिंपिक्सला केलेल्या चुका यंदा टाळलेल्या दिसतात त्यामुळे इतिहासातील सर्वात मजबूत  भारतीय टीम यावेळी ऑलिंपिक्सला  जात असावी.

पुरुष एकेरी: श्रीकांत किदाम्बी

महिला एकेरी: सायना नेहवाल (बस नाम ही काफी है ;) - पण यावेळी तिला ५वे मानांकन मिळाले आहे त्यामुळे स्पर्धा अधिक असेल), पी.व्ही.सिंधू

महिला दुहेरी: ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा (राष्ट्रकुल सुवर्ण, जागतिक स्पर्धा ब्रॉन्झ)

पुरुष दुहेरी: मनु अत्री आणि बी. सुमित रेड्डी

यावेळी भारताला पदकाची आशा? अर्थातच! सायना नेहवाल हिच्याकडून एका पदकाची (खरंतर सुवर्णाची) अपेक्षा करायला हरकत नाही. या व्यतिरिक्त माझ्यामते महिला दुहेरी स्पर्धेत किमान ब्रॉन्झ मिळण्याची मला आशा वाटते.

बास्केटबॉल

बास्केटबॉल

या स्पर्धेमध्ये २ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील. स्त्रिया व पुरूष यांच्या सांघिक स्पर्धा या क्रीडाप्रकारात खेळल्या जातील. संघांना ग्रुप्समध्ये विभागले जाईल (ग्रुप्स घोषित झाले आहेत). ज्यात प्रत्येक संघाला ग्रुप मधील इतर प्रत्येक संघाबरोबर खेळावे लागेल. यातील अव्वल ४ संघ सेमी फायनल खेळतील. त्याचे विजेते सुवर्णपदकासाठी खेळतील तर सेमी फायनलमध्ये पराभूत झालेले ब्रॉन्झ पदकासाठी खेळतील.

स्पर्धा कधी होणारः सगळ्या प्रकारच्या स्पर्धा ६ऑगस्ट सुरू होतील.त्यांचे निकाल २० व २१ ऑगस्टला लागतील

यावेळी भारताकडून कोण? संघ अपात्र

यावेळी भारताला पदकाची आशा? गैरलागू