ऑलिंपिक २०१६: बोभाटा ऑलिंपिक गाइड भाग 4

लिस्टिकल
ऑलिंपिक २०१६: बोभाटा ऑलिंपिक गाइड  भाग 4

ऑलिंपिक्स सुरू होण्यापूर्वी यात सोहळ्यात असणार्‍या खेळांची माहिती वाचूया:

शूटिंग (नेमबाजी) (Shooting)

शूटिंग (नेमबाजी) (Shooting)

गेल्या दोन ऑलिंपिक्सपासून ग्लॅमर आणि अपेक्षा वाढलेल्या या खेळात १५ पदके पणाला लागलेली असतील. यात महिला व पुरूष गटांमधे रायफल, पिस्तुल प्रकारात स्थिर लक्ष्य, तर शॉटगन प्रकारात हलत्या लक्ष्याचा वेध घ्यायचा असतो.

रायफल आणि पिस्तुल प्रकारामध्ये ठराविक अंतरावरील १० रंगात रंगवलेल्या लक्ष्याचा वेध घ्यायचा असतो. सर्वात मध्यावर मारलेल्या नेमांना सर्वाधिक गुण मिळतात. व गुणांच्या बेरजेवरून पुढील फेरीत जाता येते. अंतिम फेरीच्या विजेत्याला सुवर्णपदकमिळते. यात १०मी, २५ मी व ५० मी अशा स्पर्धा होतात. तर स्पर्धकांना त्या-त्या स्पर्धेच्या नियमानुसार उभे राहून, गुडघ्यांवर बसून किंवा झोपून वेध घ्यायचा असतो.

शॉटगन स्पर्धेत समोर उडणाऱ्या चकतीचा / एकावेळी २ चकत्यांचा वेध घ्यायचा असतो. ठराविक वेळेत सर्वाधिक चकत्यांचा / चकत्यांच्या संचाचा वेध घेणारा विजेता ठरतो.

यावेळी भारताकडून कोण?

गेल्या वर्षी ११ खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. तर यावेळी १२ खेळाडू पात्र ठरले आहेत:

पुरूष

अभिनव बिंद्रा: १० मी रायफल (ऑलिंपिक'०८ सुवर्ण)

गगन नारंग (२०१२ ऑलिंपिक्स ब्रॉन्झ, 3 राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये मिळून ८ सुवर्ण, दोनदा जागतिक विक्रम (६००/६००)) - १० मी एअर रायफल, ५०मी रायफल प्रोन, ५० मी रायफल ३ पोझिशन्स

क्यान चेनाई: ट्रॅप

मैराज खान: स्कीट (या प्रकारात पात्र ठरणारा पहिला भारतीय, स्कीट वर्ड कप २०१६ मध्ये रजत पदक)

प्रकाश नान्जप्पा: ५० मी पिस्तुल

जीतू राय (वर्डकप, आशियायी खेळ, राष्ट्रकूल खेळ सर्वात सुवर्ण):  १० मी एअर पिस्तुल , ५०मी पिस्तुल

चैन सिंग:  ५०मी रायफल प्रोन, ५० मी रायफल ३ पोझिशन्स

गुरप्रीत सिंग: १० मी एअर पिस्तूल, ५० मी रॅपिड फायर

मानवजीतसिंग साधू (खेलरत्न, जगात#१ - २००६, सध्या#३): ट्रॅप

महिला

अपुर्वी चंदेला: (राष्ट्रकुल सुवर्ण): १० मी एअर रायफल

अयोनिका पौल: १० मी एअर रायफल

ट्रॅप: शगुन चौधरी

हीना सिधु (दुहेरीमध्ये राष्ट्रकुल सुवर्ण, एकेरी रौप्य, आशियाई रौप्य):  १० मी एअर पिस्तुल , २५ मी पिस्तुल

यावेळी भारताला पदकाची आशा?

माझ्यामते अभिनव बिंद्रा/गगन नारंग यांच्यातून १/२ पदके, मानवजीत, जीतू यांपैकी १ व नशीब असेल तर मैराज व हीना यांपैकी १ असे ३ ते ४ पदकांची अपेक्षा केल्यास अवाजवी ठरू नये.

जलतरण (Swimming)

जलतरण (Swimming)

विविध प्रकारच्या स्पर्धा या क्रीडाप्रकारात खेळवल्या जातात आणि सर्व मिळून तब्बल ३४ सुवर्णपदके पणाला लागलेली असतात. इतक्या प्रमाणात पदके मिळवून देणार्‍या या खेळात अर्थात भरपूर देशांचा सहभाग असतो.

 

यात पुढील स्पर्धा होतातः

फ्रीस्टाईलः ५०, १००, २००, ४०० मीटर स्त्रिया व पुरुषांच्या शर्यती, ८०० मीटर स्त्रियांची शर्यत आणि १५०० मी पुरुष शर्यत

बॅकस्ट्रोकः १०० आणि २०० मीटर शर्यती (महिला व पुरूष)

ब्रेस्टस्ट्रोकः १०० व २०० मीटर शर्यती (महिला व पुरूष)

बटरफ्लायः १०० व २०० मीटर शर्यती (महिला व पुरूष)

वैयक्तिक मेडली*: २०० आणि ४०० मीटर शर्यती (महिला व पुरूष)

रिलेज (सांघिक): ४X१०० फ्रीस्टाईल, ४X२०० फ्रीस्टाईल, ४x१०० मेडली शर्यती (महिला व पुरूष)

मॅरेथॉन: १० किलोमीटर्स ओपन वॉटर मधल्या शर्यती (महिला व पुरूष)

*मेडली स्पर्धेत स्पर्धकांना बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, बटरफ्लाय आणि फ्रीस्टाईल या चारही प्रकारात पोहावे लागते.

यावेळी भारताकडून कोण?

पुरुष २०० मी बटरफ्लायमध्ये साजन प्रकाश तर महिला २०० मी फ्रीस्टाईलमध्ये शिवानी कटारीया पात्र ठरली आहे. (युनिव्हर्सिटी इन्व्हिटेशनमुळे सहभागी होऊ शकले आहेत)

यावेळी भारताला पदकाची आशा?

दोघांचीही सर्वोत्तम वेळ क्वालिफिकेशन मार्कलाही पोचलेली नाही तेव्हा आशा शून्य आहे.

सिंक्रोनाईज्ड जलतरण (Synchronised Swimming)

सिंक्रोनाईज्ड जलतरण (Synchronised Swimming)

सौंदर्य, नृत्य, लालित्य आणि खेळ या सगळ्याचा सहभाग असलेला हा अत्यंत 'प्रेक्षणीय' क्रीडाप्रकार आहे. यात २ सुवर्णपदके पणाला लागलेली असतात.

यात दोन प्रकारच्या स्पर्धा होतात. जोडी (ड्युएट) आणि सांघिक (टीम). यात पाण्याखालीदेखील 'अंडरवॉटर' स्पीकर्स असतात ज्यांच्या मदतीने स्पर्धक संगीताच्या तुकड्यावर जलनृत्याने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडतात. जजेस गुण देतात व त्यांची बेरीज अंतिम फेरीतील स्पर्धक निवडतात. जजेस गुण देताना नृत्यदिग्दर्शन (कोरिओग्राफी), काठिण्यपातळी आणि त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण याचा विचार करतात.

यावेळी भारताकडून कोण?

अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?

गैरलागू

टेबल टेनिस(Table Tennis)

टेबल टेनिस(Table Tennis)

भारतासह आशियाई देशांमध्ये बर्‍यापैकी खेळल्या जाणार्‍या या खेळात एकूण चार सुवर्णपदके पणाला लागलेली असतात

भारतातही सर्वत्र खेळल्या जाणार्‍या या खेळाविषयी, त्याच्या नियमांविषयी अधिक माहिती देत नाही. थोडक्यात सांगायचं तर २.७ ग्रॅम इतक्या हलक्या वजनाच्या चेंडूने एका १८मी X ९मी टेबलवर खेळले जाणारे हे टेनिस आहे.

या स्पर्धा 'नॉक-आऊट' पद्धतीने खेळवल्या जातील. स्पर्धा सुरू होण्याआधी ड्रॉ होईल आणि अंतिम फेरीतील विजेता सुवर्ण तर उपांत्य फेरीतील पराभूत कांस्य पदक जिंकतील. महिला व पुरूष एकेरी व दुहेरी अश्या चार प्रकारात स्पर्धा होतील

यावेळी भारताकडून कोण?

पुरूष एकेरी: शरथ अचंता, सौम्यजीत घोष (गंमत म्हणजे गेल्या ऑलिंपिक्सना सौम्यजित या तेव्हाच्या सर्वात तरुण खेळाडूने शरथलाच हरवून क्वालिफिकेशन पटकावले होते. यंदा दोघेही क्वालिफाय झाले आहेत.)

महिला एकेरी: मनिका बात्रा, मौमा दास

यावेळी भारताला पदकाची आशा?

जागतिक रँकिंगमध्यी ५०च्याहीवर असलेल्या चौघांपैकी कुणाहीकडून पदकाची अपेक्षा करता येऊ नये.

तायक्वान्दो(Taekwondo)

तायक्वान्दो(Taekwondo)

अक्षरशः लाथा आणि बुक्के यांनी रंगत भरणारा हा 'कोरियन मार्शल आर्ट'चा प्रकार अल्पावधीत लोकप्रिय ठरला - ठरतो आहे. यात तुम्ही लाथा-बुक्के स्कोरिंग झोनमध्ये- म्हणजे कमरेवर- कुठे मारताय यावर गुण दिले जातात. जर समोरच्याच्या कमरेपासून गळ्यापर्यंतच्या भागात हल्ला केला (साधी लाथ किंवा बुक्क्याने) तर एक गुण दिला जातो. जर याच भागात फिरती लाथ (Turning Kick) दिल्यास दोन गुण दिले जातात. गळ्याच्या वर - डोक्यावर- जर योग्य लाथ बसली तर तीन गुण आणि डोक्याला फिरती लाथ बसल्यास चार गुण दिले जातात.

प्रत्येक स्पर्धा दोन मिनिटांच्या तीन फेर्‍यांनी बनलेली असते. निळ्या रंगातील स्पर्धकाला चंग तर लाल रंगातील स्पर्धकाला हाँग म्हणतात. ही चंग-हाँगची ६ मिनिटांची लढाई जोषाचा पुरेपूर अनुभव देते हे नक्की.

सदर स्पर्धा बाद फेर्‍याण्मधे खेळवली जाईल. पुरुषांचे चार व महिलांचे चार वजनी गट मिळून एकूण ८ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील.

यावेळी भारताकडून कोण?

अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?

गैरलागू

टेनिस(Tennis)

टेनिस(Tennis)

पाच सुवर्णपदके देऊ शकणार्‍या या खेळाविषयी भारतात बर्‍यापैकी जागृती आहे तेव्हा त्याच्या नियमांबद्द्ल अधिक सांगत नाही. ऑलिंपिक स्पर्धा मात्र इतरांपेक्षा वेगळी यासाठी असते की इथे देशाच्या खेळाडूंची संख्या ठराविक असते. प्रत्येक देशाला जास्तीत जास्त १२ जणांचा चमू पाठवता येतो. ज्यात ६ महिला व ६ पुरूष असू शकतात. यापैकी जास्तीत जास्त ४ खेळाडू एकेरी आणि जास्तीत जास्त २ दुहेरीचे संघ पाठवता येतात. मिश्र दुहेरीसाठी जास्तीत जास्त २ संघ पाठवता येतात.

अजून एक अट अशी की स्पर्धक २००९ ते २०१२ पैकी किमान दोन स्पर्धांत (ज्यापैकी किमान एक २०११/१२ असणे बंधनकारक) देशासाठी डेव्हिस किंवा फेड कपमध्ये खेळलेला असणे बंधनकारक आहे. आणि ही अट अशी आहे ज्यामुळे अनेकदा काही मातब्बर खेळाडू वजा होतात.

पुरुष एकेरीची अंतिम फेरी पाच सेट्सची असते. अन्यथा सर्व स्पर्धा तीन सेट्सच्या खेळवल्या जातात.

यावेळी भारताकडून कोण?

यावेळी भारताकडून एकेरी स्पर्धेत कोणीही खेळणार नाहीये. मात्रे गेल्या ऑलिंपिक्सच्या वेळचा भुपती-पेस जोडगोळीतील बेवनाव व स्पर्धेमुळे निर्माण झालेला सावळा गोंधळ टाळत यावेळी भुपतीला डच्चु दिला आहे.

सानिया मिर्झा (दुहेरीतील सद्य नं.१) आणि रोहन (दुहेरीतील सद्य नं१०) हे मिश्र दुहेरीत एकत्र खेळत आहेतच शिवाय महिला दुहेरीत सानिया प्रार्थना ठोंबरे सोबत तर पुरुष दुहेरीत रोहम लिअँडर पेससोबत खेळणार आहे.

यावेळी भारताला पदकाची आशा?

यावेळी तिन्ही जोड्यांपैकी कोणतीही एक जोडी एखादे पदक तरी मिळवेलच असे वाटते. नशीब जोरावर असले तर दोन पदकेही मिळू शकतात

ट्रॅम्पोलाईन(Trampoline)

ट्रॅम्पोलाईन(Trampoline)

उड्या मारणे हा पळण्यापाठोपाठ माणसाचा बहुदा दुसरी नैसर्गिक ऊर्मी असावी. लहानपणी मुले पळण्याइतकेच आपण उड्या मारताना पाहतो. तर या उड्या मारण्याच्या प्राथमिक खेळाचे तंत्रशुद्ध व कलात्मक उड्या मारण्यातले रुपंतर म्हणजे ट्रॅम्पोलाईन!

यात उड्या मारण्याची चटई असते ज्याला ट्रॅम्पोलाईन म्हणतात. असे दोन ट्रॅम्पोलाईन्स एकमेकांशेजारी २मी अंतरावर (आणि परीक्षकांपासून केवळ १० मी अंतरावर) ठेवलेले असतात. प्रत्येक ट्रॅम्पोलाईन ५.०५मी लांब, २.९१मी रुंद आणि १.१५५ मी उंचीवर असतो. ही चटई ६मीमी पेक्षा कमी जाडीच्या पट्ट्यांनी बनलेली असते आणि बाजूच्या चौकटीला १००पेक्षा अधिक स्प्रिंग्जच्या माध्यमातून जोडलेली असते.

स्पर्धक एकूण १० वेळा विविध गुणांचे प्रदर्शन करतात ज्यात एकेरी उडी, एकेरी, दुहेरी, तिहेरी कोलांटी उडी (somersaults), उभ्या अक्षा भोवती फिरणार्‍या कोलांट्या उड्या वगैरेचे प्रदर्शन होते. मुख्य उद्देश जास्तीत जास्त वेळ हवेत राहणे हा असतो ज्यात उत्तम तंत्र, शरीरावर पूर्ण नियंत्रण असणे अर्थातच अत्यावश्यक असते. परीक्षक काठिण्यपातळी, प्रत्येक सादरीकरण, हवेतील वेळ वजा पेनल्टी या निकषांवर गुण देतात

या प्रकारात १-१ पदक महिला व पुरूष स्पर्धकांना पटकावता येतील.

यावेळी भारताकडून कोण?

अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?

गैरलागू

ट्रायथ्लॉन(Triathlon)

ट्रायथ्लॉन(Triathlon)

गेल्या भागात आपण आधुनिक पंचकर्म पाहिले होते. तसेच या 'ट्रायथ्लॉन' स्पर्धेत तीन खेळांचा समावेश असतो. स्पर्धकांना पोहणे, धावणे आणि सायकलिंग या तिन्ही प्रकारात प्रावीण्य असणे गरजेचे असते.

या स्पर्धा वेगवेगळ्या अंतरांसाठी खेळवल्या जातात, मात्र यंदाच्या ऑलिंपिकमध्ये महिला व पुरूष संघ १५०० मी पोहणे, ४३ किमी सायकलिंग आणि १० किमी धावणे समाविष्ट आहे. स्पर्धेचा फ़ॉर्मॅट 'शर्यत' असले. म्हणजे सुरुवातीच्या रेषेवरून शेवटापर्यंत स्पर्धक खेळायला सुरवात करतील आणि कोणत्याही ब्रेकशिवाय स्पर्धा धावून संपवतील.

यावेळी भारताकडून कोण?

अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?

गैरलागू