आयपीएल स्पर्धेच्या (ipl) इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळताना या संघाने ४ वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. परंतु आयपीएल २०२२ स्पर्धेत रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली या संघाला सलग ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल याने सर्वांना आश्चर्यचकित करणारे वक्तव्य केले आहे.
पार्थिव पटेलने क्रिकबजसोबत बोलताना म्हटले आहे की, एमएस धोनीने (MS Dhoni) आपल्या कारकीर्दीची सुरुवात सलामीवीर म्हणून केली होती. त्याला पुन्हा सलामी का देऊ नये. एमएस धोनी सध्या सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याला केवळ १० ते १५ चेंडू खेळायला मिळतात. आता चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी तो नंबर तीन, चार किंवा डावाची सुरुवात देखील करू शकतो. तो १४-१५ षटके तिथे राहिला तर काहीही होऊ शकते. तुम्हालाही काहीतरी वेगळं करावं लागेल.
एमएस धोनीने आयपीएल २०२२ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध तुफानी अर्धशतक झळकावले होते. त्याने ३८ चेंडूंमध्ये ५० धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याला संघासाठी एकही मोठी खेळी करता आली नाहीये. तो जेव्हा फॉर्ममध्ये असतो त्यावेळी तो कुठल्याही गोलंदाजाविरुद्ध मोठी खेळी करू शकतो. धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याने ७ डावात १ अर्धशतकासह १८८ धावा केल्या आहेत.
आयपीएल २०२२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्याच्याऐवजी रवींद्र जडेजाला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला आतापर्यंत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या संघाने आतापर्यंत सलग ४ सामने गमावले आहेत.
