पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली खेळताना आजच्याच दिवशी (३ फेब्रुवारी ) भारतीय संघाने अंडर -१९ विश्वचषक २०१८ स्पर्धा जिंकली होती. अंडर -१९ स्पर्धेत जोरदार कामगिरी केल्यानंतर खेळाडू वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र काही मोजकेच खेळाडू असतात,जे भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरतात. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी अंडर -१९ विश्वचषक जिंकल्यानंतर वरिष्ठ संघात स्थान मिळवले.
केवळ ४ खेळाडूंनी मिळवले वरिष्ठ संघात स्थान...
२०१८ मध्ये झालेल्या अंडर -१९ विश्वचषक स्पर्धेत १६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा होऊन ५ वर्षे उलटली आहेत, केवळ ४ असे खेळाडू आहेत जे वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. ज्यामध्ये कर्णधार पृथ्वी शॉ, मालिकावीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि शिवम मावी यांचा समावेश आहे. तर रियान पराग, कमलेश नागरकोटी आणि अभिषेक शर्मा सारख्या खेळाडूंना केवळ आयपीएल खेळण्याची संधी मिळाली.
आयपीएल स्पर्धेत अनुकूल रॉय ईशान पोरेल सारख्या खेळाडूंना देखील संधी मिळाली. मात्र त्यांना जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. मुख्य बाब म्हणजे अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेला मनजोत कारला दुखापतग्रस्त झाल्यानंतर पुन्हा खेळताना दिसून आला नाही.
अशी होती आयसीसी अंडर -१९ विश्वचषक २०१८ स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी..
भारतीय संघाने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वे संघाला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. इथे भारतीय संघाचा सामना बांगलादेश संघासोबत झाला होता. या सामन्यात बांगलादेश संघाला पराभूत करत भारतीय संघाने उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीतील सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. मात्र या सामन्यात शुभमन गिलच्या शतकी खेकीच्या जोरावर भारतीय संघाने २०३ धावांनी धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरले होते.
