ICC T-20 WC २००७ चा हिरो ठरलेल्या कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला राम राम?

ICC T-20 WC २००७ चा हिरो ठरलेल्या कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला राम राम?

भारताला २००७ टी -२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या गोलंदाज जोगिंदर शर्माने (Jogindar Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. जोगिंदर शर्मा हा नेहमीच क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात राहील. कारण २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघ विजयाच्या अगदी जवळ होता. त्यावेळी जोगिंदर शर्माने शेवटचे षटक टाकत, भारताला विजय मिळवून दिला होता. सध्या तो हरियाणामध्ये पोलीस उपअधीक्षकाची भूमिका पार पाडतोय.

हरियाणातील रोहतकमध्ये राहणाऱ्या जोगिंदर शर्माने भारतीय संघासाठी एकूण ४ टी -२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ९.५२ च्या सरासरीने ४ गडी बाद केले आहेत. तर ४ वनडे सामन्यांमध्ये त्याला १ गडी बाद करता आला आहे. तर आयपीएल स्पर्धेत त्याला १६ सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याला १२ गडी बाद करण्यात यश आले होते.

जोगिंदर शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने बीसीसीआय,हरियाणा क्रिकेट असोसिएशन, हरियाणा सरकार आणि चेन्नई सुपर किंग्सचे आभार मानले आहेत. तसेच त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.

जोगिंदर शर्माचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला जाईल,तेव्हा त्याने २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात टाकलेल्या षटकाचा देखील उल्लेख केला जाईल. अंतिम षटकात त्याने मिस्बाह अल हकला बाद करत अंतिम सामना जिंकून दिला होता.