भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये नुकताच दोन कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दोन्ही सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघावर २३८ धावांनी विजय मिळवला. यासह कसोटी मालिका २-० ने आपल्या नावावर केली. या विजयात भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने मोलाचे योगदान दिले. दरम्यान त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
आर अश्विनने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात सर्वाधिक ४ गडी बाद केले. यासह त्याने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गडी बाद करण्याचे शतक झळकावले आहे. त्याने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १९.७ च्या सरासरीने १०० गडी बाद केले आहेत. ज्यामध्ये त्याने ४ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स या यादीत ९३ गडी बाद करत दुसऱ्या स्थानी आहे. यासह त्याने डेल स्टेनला देखील मागे टाकले आहे. डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमध्ये ४३९ गडी बाद केले होते. तसेच आर अश्विनने आतापर्यंत ४४२ गडी बाद केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याच्या बाबतीत तो ८ व्या क्रमांकावर आहे. या यादीत ८०० गडी बाद करत श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन सर्वोच्च स्थानी आहे.
