जेव्हा १००९ धावा करूनही ३५४ धावांनी पराभूत झाला होता संघ; एकाच सामन्यात झळकावले गेले होते १९ शतक

जेव्हा १००९ धावा करूनही ३५४ धावांनी पराभूत झाला होता संघ; एकाच सामन्यात झळकावले गेले होते १९ शतक

क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्या खेळात शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ विजयी होईल याचा अंदाज लावता येत नाही. केव्हाही सामना कुठल्याही संघाच्या दिशेने जाऊ शकतो. परंतु अनेकदा या खेळात असे काहीतरी घडते ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. कधी कधी एकाच षटकात ३६ धावा ठोकल्या जातात तर कधी कधी संपूर्ण संघाचा डाव ३० धावांवर संपुष्टात येतो. एखाद्या संघाने १ हजार धावा करूनही ३०० धावांनी पराभूत होण्याचा किस्सा तुम्ही ऐकला आहे का? नाही ना? आम्ही या लेखातून तुम्हाला अशाच एका सामन्याचा रोमांचक किस्सा सांगणार आहोत, ज्यावेळी संघाला १ हजार धावा करूनही ३०० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

तो दिवस होता ११ मार्च १९४९. बॉम्बे (मुंबई) आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू होता. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील हा सामना पुणे येथे सुरू होता. उपांत्य फेरीतील सामना नेहमीच रोमांचक होत असतो. कारण दोन्ही संघ अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी धडपड करत असतात. या सामन्यात देखील असाच काहीसा रोमांच पाहायला मिळाला होता. सात दिवस सुरू राहिलेल्या या सामन्यात एकूण २ हजार ३७५ धावा कुटल्या गेल्या होत्या.

या ऐतिहासिक सामन्यात बॉम्बे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बॉम्बे संघाकडून माधव मंत्रीने दुहेरी शतक झळकावले होते. तर उदय मर्चंट आणि दत्तू फडकरने तुफानी शतक झळकावले होते. जेव्हा संघातील तीन फलंदाज तिहेरी धावसंख्या गाठतात त्यावेळी मोठी धावसंख्या होण साहजिकच आहे. या सामन्यात बॉम्बे संघाने प्रथम फलंदाजी करताना ६५१ धावा केल्या होत्या.

महाराष्ट्र संघाची फलंदाजी आली त्यावेळी महाराष्ट्र संघातील फलंदाजांनी देखील जोरदार फलंदाजी केली. या संघाकडून मनोहर दातार आणि मधुसूदन रेगे यांनी शतकी खेळी केली. या शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाला अवघ्या ४०७ धावा करण्यात यश आले होते. यासह बॉम्बे संघाला २०० पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळाली होती. 

बॉम्बे संघ ज्यावेळी दुसऱ्या डावात फलंदाजीला आला त्यावेळी बॉम्बे संघाकडे २०० पेक्षा अधिक धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात देखील बॉम्बे संघातील फलंदाजांनी महाराष्ट्र संघातील गोलंदाजांचा घाम काढला. सहाव्या दिवशी बॉम्बे संघाने आपला डाव ७१४ धावांवर घोषित केला होता.

तसेच महाराष्ट्र संघाला हा सामना जिंकण्यासाठी ९५९ धावांची आवश्यकता होती. इतके मोठे आव्हान पाहून कुठलाही संघ हाच विचार करेल की, आपला पराभव निश्चित आहे. परंतु महाराष्ट्राच्या फलंदाजांनी टीचून फलंदाजी केली. या संघाकडून मधुसूदन रेगेने पुन्हा एकदा शतक झळकावले. यावेळी त्याला दुसऱ्या टोकाकडून शरद देवधरची उत्तम साथ मिळाली, त्याने एकट्याने १४६ धावा केल्या. सदाशिव पळसुलेने ९७ आणि मनोहर दातारने ८६ धावांचे योगदान दिले. या उत्कृष्ट खेळीनंतरही महाराष्ट्राला हा सामना जिंकता आला नाही हे खरे आहे. महाराष्ट्र संघाने धावांचा पाठलाग करताना ६०४ धावा केल्या. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्र संघाने जो संघर्ष केला तो क्रिकेटच्या सुवर्ण अक्षरात लिहला गेला.

महाराष्ट्र संघाने या सामन्यात एकूण १००८ धावा केल्या. तरीदेखील महाराष्ट्र संघाला ३५४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तसेच या सामन्यात एकूण ९ शतक झळकावले गेले. तसेच १० गोलंदाजांनी गोलंदाजी करताना १०० पेक्षा अधिक धावा खर्च केल्या होत्या. ७ दिवस सुरू राहिलेल्या या सामन्यात ७०७.२ षटक टाकले गेले. तसेच एकूण २३७६ धावा कुटल्या गेल्या.