भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद ( Rameshbabu Praggnanandhaa) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी आर प्रज्ञानंदने पाच वेळेस विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केले होते. आता पुन्हा एकदा कार्लसनला पराभूत करत आर प्रज्ञानंदने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. यापूर्वी कार्लसनला दोन वेळेस त्याने ऑनलाईन इव्हेंटमध्ये पराभूत केले होते. मात्र हा विजय मिळवून देखील त्याला क्रीप्टो कप स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.(Rameshbabu Praggnanandha)
मॅग्नस कार्लसनला ( Magnus Carlsen) आर प्रज्ञानंद विरुध्द टाय ब्रेकमध्ये ४-२ ने पराभवाचा सामना करावा लागला. तरीदेखील त्याने पहिल्या स्थानी मजल मारली. त्याने या सामन्यात एकूण १६ गुणांची कमाई केली होती. तर आर प्रज्ञानंदला १५ गुणांची कमाई करण्यात यश आले होते. तसेच अलिरोजा फिरोउजाने देखील १५ गुणांची कमाई केली होती. मात्र या स्पर्धेत अलिरोजा फिरोउजाला आर प्रज्ञानंदविरुध्द झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्याने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. (crypto cup)
१७ वर्षीय आर प्रज्ञानंद गेल्या काही वर्षांपासून भारताची शान वाढवत आहे. जगज्जेत्या कार्लसन आणि आर प्रज्ञानंद यांच्यातील सामन्यात सुरुवातीचे दोन गेम अनिर्णीत राहिले होते. त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये कार्लसनने जोरदार पुनरागमन केले आणि तिसरा गेम आपला नावावर केला. त्यानंतर चौथ्या गेममध्ये आर प्रज्ञानंदने देखील चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत चौथा गेम आपल्या नावावर केला आणि सामना टाय ब्रेकमध्ये पोहोचला. टाय ब्रेकमध्ये देखील सुरुवातीचे दोन गेम जिंकून प्रज्ञानंदने कार्लसनला आश्चर्यचकित केले होते. यापूर्वी देखील त्याने दोन वेळेस कार्लसनला पराभूत केले आहे. तसेच बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये त्याने भारत ब संघाला कांस्यपदक मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते.
दोन सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर कार्लसनला केले पराभूत..
कार्लसन विरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी प्रज्ञानंदला या स्पर्धेतील दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याला रविवारी (२१ ऑगस्ट) पोलंडच्या जान क्रिजिस्टॉपने टाय ब्रेकमध्ये ४-२ ने पराभूत केले होते. तर शनिवारी त्याला चीनच्या क्वांग लीम लीने पराभूत केले होते. या स्पर्धेत विजय मिळवणाऱ्या खेळाडूला ६ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत.
