भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येत असतात त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. आपल्या संघाला सामना जिंकून देण्यासाठी हे खेळाडू कुठल्याही थराला जाऊ शकतात. अगदी समोरच्या खेळाडूला दुखापतग्रस्त करायची वेळ आली तरी हे खेळाडू मागे पुढे पाहत नाही. क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे असे म्हटले जाते. मग विरोधी संघातील खेळाडूला दुखापतग्रस्त करणं योग्य आहे का? नाही ना? मात्र सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंनी याच रणनीतीचा वापर केला होता. असा खुलासा दिग्गज पाकिस्तानी गोलंदाजाने केला आहे.
पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. यावेळी त्याने २३ वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगितला आहे. १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने आले होते. त्यावेळी पाकिस्तान संघाने भारतीय संघातील फलंदाजांना दुखापतग्रस्त करण्याची रणनीती आखली होती.
हा सामना १९९९ मध्ये मोहालीच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्याबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर चर्चा करत होते. यादरम्यान शोएब अख्तरने म्हटले की, "मी त्या सामन्यात सतत फलंदाजांच्या डोक्याला आणि बरगड्यांना चेंडू मारण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही सौरव गांगुलीच्या बरगड्यांना चेंडू मारण्याची रणनिती आखली होती. मुख्य बाब म्हणजे सामन्याच्या एक दिवसापूर्वी ही रणनिती संपूर्ण संघाने मिळून बनवली होती.
तसेच तो पुढे म्हणाला की, "जेव्हा टीम मीटिंग झाली त्यावेळी मला सांगण्यात आले होते की, माझे काम केवळ फलंदाजांना दुखापतग्रस्त करण्याचे असणार आहे. त्यावेळी मी विचारले देखील होते की, फलंदाजांना बाद करायचं आहे की नाही? त्यावेळी ते म्हणाले होते की, फलंदाजांना बाद करण्याचं काम आमचं असणार आहे. तुझ्याकडे गती आहे, तू फलंदाजांना अडचणीत टाकायचं काम कर,बाकीचे आम्ही पाहू."
शोएब अख्तरने सांगितलेला किस्सा ऐकताच वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, "मला खात्री आहे की, सौरव गांगुली देखील हा शो पाहत असेल आणि भेटल्यावर नक्कीच चर्चा करेल." याबाबत बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, "ही, मी गांगुलीला सांगितलं होतं की, आमची रणनिती तुला बाद करायची नव्हती तर तुला दुखापतग्रस्त करण्याची होती." सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू कुठल्याही थराला जाऊ शकतात. मात्र आता शोएब अख्तर आणि सौरव गांगुली हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. अनेकदा हे दोघे एकत्र समालोचन करताना दिसून आले होते.
