क्रिकेट इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले ज्यांना दीर्घ काळ सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र कमी वेळात त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. काही क्रिकेटपटू आपल्या विक्रमांमुळे आणि अप्रतिम कामगिरीमुळे ओळखले जातात. तर काही खेळाडू एखाद्या विशिष्ठ घटनेमुळे प्रसिद्ध होऊन जातात. बोभाटाच्या आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका खेळाडूबद्दल माहिती देणार आहोत, ज्याचा मृत्यू मैदानावर चेंडू लागल्यामुळे झाला होता.
क्रिकेट हा प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा खेळ आहे. मात्र हाच खेळ कधीतरी जीवघेणा ही ठरू शकतो. भारताचे माजी क्रिकेटपटू रमन लांबा यांनी क्षेत्ररक्षण करताना आपला जीव गमावला होता. रमन लांबा यांचा जन्म २ जानेवारी १९६० रोजी मेरठ येथे झाला होता. त्यांना भारतीय संघासाठी ४ कसोटी आणि ३२ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली.
डोक्याला चेंडू लागल्याने गमावला जीव..
रमन लांबा यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात बुलेट ट्रेन सारखी झाली होती. मात्र त्यानंतर त्यांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. हेच कारण होते की, त्यांना संघाबाहेर करण्यात आले होते. फॉर्ममध्ये येण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. भारतासह बांगलादेशमध्ये ही त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहभाग घेतला. मात्र बांगलादेशमध्ये खेळणं त्यांना खूप भारी पडलं. बांगलादेशमध्ये खेळताना क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्या डोक्याला चेंडू लागला आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी रमन लांबा मोहम्मडन संघाविरुद्ध खेळताना अबाहानी क्रीडा चक्र संघाचे प्रतिनिधित्व करत होते.
तर झाले असे की, अबाहानी संघाकडून सैफुल्लाह खान गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर कर्णधार खालिद मसूदने रमन लांबा यांना शॉर्ट लेग वर क्षेत्ररक्षण करण्यासाठी हलवले. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असताना कर्णधाराने रमन लांबा यांना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी नकार दिला होता. पुढील चेंडूवर गोलंदाजाने शॉर्ट चेंडू टाकला. ज्यावर फलंदाजाने पुल शॉट मारला. हा चेंडू सरळ रमन लांबा यांच्या डोक्याला लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला. संपूर्ण संघ जल्लोष साजरा करणार इतक्यात रमन लांबा खाली पडले. त्यांना त्वरित रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. ३ दिवस संघर्ष केल्यानंतर अखेर २२ फेब्रुवारी १९९८ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
