फुटबॉल विश्वाने एक दिग्गज खेळाडू गमावला आहे. ब्राझील संघाला ३ वेळेस विश्वविजेत्या संघाचा मान मिळवून देणाऱ्या पेले यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. गुरुवारी (२९ डिसेंबर) मध्यरात्री पेले यांच्या मुलीने याबाबत माहिती दिली. ब्राझीलच्या एका छोट्या भागातून येणाऱ्या पेले यांनी अशी काही जादू केली अन् फुटबॉलची व्याख्याच बदलून टाकली.
गरिबीत वाढलेल्या यांनी फुटबॉल खेळाला उंचीवर नेत अनेक नवनवीन विक्रम प्रस्थापित केले. बोभाटाच्या या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पेले यांना जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू का म्हटंल जातं.
पेलेंच्या नावे आहे या विक्रमांची नोंद..
१) आपल्या राष्ट्रीय संघाला ३ वेळेस फुटबॉल विश्वचषक जिंकवून देणारे एकमेव खेळाडू. त्यांनी १९५८,१९६२ आणि १९७९ रोजी ब्राझील संघाला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जिंकवून दिली होती.
२) पेले वयवर्ष १८ पेक्षा कमी असताना फिफा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारे एकमेव खेळाडू आहेत.
३) १९५८ रोजी सुदान संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात पेले यांनी २ गोल केले होते.
४) पेले यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण १३६३ सामन्यांमध्ये १२८१ गोल केले. तसेच ब्राझील संघासाठी खेळताना ९२ सामन्यांमध्ये ७७ गोल केले.
५) पेले यांनी १९७१ रोजी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.
विश्वचषक सारख्या स्पर्धेत पेले यांनी जोरदार एन्ट्री केली होती. त्यावेळी त्यांचे वय केवळ १७ वर्ष आणि २३९ दिवस इतकेच होते. मात्र मूर्ती लहान आणि कीर्ती महान ठरवत पेले यांनी १९५८ विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात गोल करत इतिहास घडवला होता. यासह ते या स्पर्धेत गोल करणारे स्पर्धेतील सर्वात कमी वयाचे खेळाडू ठरले होते. त्यानंतर फ्रान्स विरुध्द झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात गोलची हॅट्ट्रिक देखील केली होती.
