रोमांचक सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला केले पराभूत!! काय आहेत पाकिस्तानच्या पराभवाची कारणे? घ्या जाणून...

रोमांचक सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला केले पराभूत!! काय आहेत पाकिस्तानच्या पराभवाची कारणे? घ्या जाणून...

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ (Icc T20 World Cup) स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. असाच एक सामना गुरुवारी (२७ ऑक्टोबर) देखील पाहायला मिळाला आहे. या सामन्यात पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघ आमने सामने आले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात झिम्बाब्वे संघाने बाजी मारली आणि १ धावेने जोरदार विजय मिळवला. मुख्य बाब म्हणजे पाकिस्तान संघाचा या टी -२० विश्वचषक स्पर्धेतील हा दुसरा पराभव आहे. काय आहेत पाकिस्तान संघाच्या पराभवाची प्रमुख कारणे? चला पाहूया.

झिम्बाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ १३० धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाला विजय मिळवण्यासाठी १३१ धावांची आवश्यकता होती. मात्र या कमी धावांचा पाठलाग करण्यात देखील पाकिस्तान संघ अपयशी ठरला आहे. या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे, पाकिस्तान संघाची कमकुवत फलंदाजी. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघातील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी पाकिस्तान संघाला हा सामना गमवावा लागला.

या सामन्यात पुन्हा एकदा सिद्ध झाले की, पाकिस्तान संघाची फलंदाजी बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान यांच्यावर अवलंबून आहे. दोघे बाद झाल्यानंतर, इतर कुठलाही फलंदाज संघाला सामना जिंकून देऊ शकत नाही. या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. दोघेही फलंदाज बाद झाल्यानंतर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. संघाचा कर्णधार बाबर आजम केवळ १४ धावा करत माघारी परतला.

टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा सुर होण्यापूर्वी अनेकांनी म्हटले होते की, पाकिस्तान संघाचे सलामीवीर फलंदाज चांगले आहेत, गोलंदाज चांगले आहेत मात्र मध्यक्रम संतुलित नाहीये. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे. इफ्तिखार अहमद, शादाब खान, हैदर अली संघाला सामना जिंकून देऊ शकले नाही.

पाकिस्तान संघाकडून शान मसूदने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४४ धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली. मात्र दुसऱ्या टोकाला एकही फलंदाज त्याला साथ देऊ शकला नाही. १६ व्या षटकात मसूदही बाद झाला आणि त्यानंतर पाकिस्तान संघ आणखी अडचणीत सापडला. यातून पाकिस्तान संघ बाहेर येऊ शकला नाही.