वयाच्या १२ व्या वर्षी सोडलं घर, क्रिकेटपटू होण्यासाठी गुरुद्वारात घालवली रात्र,आज आहे फियरलेस रिषभ पंत...

वयाच्या १२ व्या वर्षी सोडलं घर, क्रिकेटपटू होण्यासाठी गुरुद्वारात घालवली रात्र,आज आहे फियरलेस रिषभ पंत...

कॅप्टन कूल एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर त्याचा उत्तराधिकारी कोण? असा प्रश्न जेव्हा उपस्थित केला जात होता. त्यावेळी एक युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तो खेळाडू म्हणजे डाव्या हाताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh pant). उत्तराखंडमधील रुडकीमध्ये जन्मलेला रिषभ पंत आज (४ ऑक्टोबर) आपला २५ वा वाढदिवस साजरा करतोय. रिषभ पंतचं नाव घेताच त्याची ऑस्ट्रेलियाच्या गाबामध्ये खेळलेली खेळी आठवते. एकवेळ भारतीय संघ सामना गमावणार असे वाटू लागले होते. मात्र कांगारूंच्या तोंडचा घास हिसकावून त्याने भारताला विजय मिळवून दिला होता. मात्र आज तो ज्या स्तरावर आहे, तिथे पोहचण्यासाठी त्याला भरपूर संघर्ष करावा लागला आहे. चला तर पाहूया त्याच्या संघर्षाची कहाणी. (Rishabh Pant Birthday Special) 

क्रिकेटपटू होण्यासाठी वयाच्या १२ व्या वर्षी सोडलं घर..

बालपणी आपण ठरवत असतो की, आपल्याला मोठे होऊन काय व्हायचं आहे. मात्र खूप कमी लोकं असतात ज्यांची स्वप्नं पूर्ण होतात. रिषभ पंत देखील त्याच लोकांपैकी एक आहे. एका छोट्या गावातून येणं आणि भारतीय संघाचा भाग होणं सोपी गोष्ट नाहीये. भारतात लाखो खेळाडू आहेत त्यांना मागे टाकून अंतिम ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं. ज्यावेळी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्यावेळी उत्तराखंडमध्ये हवी तशी सुविधा नव्हती. त्यामुळे त्याने वयाच्या १२ व्या वर्षी सोडलं आणि दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.

गुरुद्वारात जेवण करून करायचा सराव, आयपीएलने बदलले नशीब...

रिषभ पंत त्याच्या आई सोबत दिल्लीत आला त्यावेळी त्याच्याकडे राहायला घर नव्हते. त्यामुळे तो गुरुद्वारात लंगर खायचा आणि मग सरावाला जायचा. मात्र त्याची मेहनत कुठेच कमी पडत नव्हती. त्याने भारतीय संघाच्या अंडर -१९ संघात स्थान मिळवले. अंडर -१९ विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर त्याला राहुल द्रविड सारख्या अनुभवी खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत त्याने सर्वात जलद अर्धशतक झळकावले होते. या स्पर्धेतील जोरदार कामगिरी पाहता, त्याची आयपीएल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. २०१६ मध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्स संघात स्थान मिळाले आणि त्याचं नशीब बदललं. पुढे काय झालं हे सर्वांनाच माहित आहे.

अनेक विक्रम केले आहेत आपल्या नावावर..

आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर २०१८ मध्ये त्याला भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने आतापर्यंत एकूण २७ कसोटी सामने खेळले आहेत. तो भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० हजार धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ३९ च्या सरासरीने १५४९ धावा केल्या आहेत. आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे.