आयपीएल २०२२(Ipl 2022) ही स्पर्धा मुंबई इंडियन्स संघासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. परंतु या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला सलग ८ वेळेस पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स संघाचे चाहते भलतेच निराश झाले आहेत.
रविवारी (२४ एप्रिल) वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्जेत सलग ८ वेळेस पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, "आम्ही अप्रतिम गोलंदाजी करून त्यांना कमी धावांवर रोखले होते. परंतु आम्हाला चांगली फलंदाजी करता आली नाही. आमच्या फलंदाजांना भागीदारी करता आली नाही तसेच फलंदाजांनी चुकीचे शॉट खेळले. चुकीचे शॉट खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये माझा देखील समावेश होता."
तसेच तो पुढे म्हणाला की, "मी केवळ एका सामन्याबद्दल बोलत नाहीये तर संपूर्ण स्पर्धेत आम्ही खराब फलंदाजी केली आहे. कुठलाही फलंदाज जबाबदारी घेऊन शेवटपर्यंत खेळू शकला नाही." मुंबई इंडियन्स संघातील मध्यक्रामातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. तसेच १५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलेला ईशान किशन देखील या स्पर्धेत साजेशी कामगिरी करू शकला नाहीये.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपरजायंट्स संघाने ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. ज्यात कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक १०३ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक ३९ धावांचे योगदान दिले. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी मुंबई इंडियन्स संघाला हा सामना ३६ धावांनी गमवावा लागला.
