नेमबाज सौरभ चौधरीची सुवर्ण कामगिरी! १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकावर साधला निशाणा

नेमबाज सौरभ चौधरीची सुवर्ण कामगिरी! १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकावर साधला निशाणा

भारताचा १९ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरी याने इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या युवा नेमबाजने १० मीटर एअर पिस्तूल प्रकराच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या मायकेल स्वॉल्डचा १६-६ असा पराभव केला. तसेच या स्पर्धेत रशियाच्या आर्टेम चेरनॉसोव्हने कांस्यपदक पटकावले. परंतु रशियाचा राष्ट्रध्वज स्कोरबोर्ड दाखवण्याची अनुमती देण्यात आली नव्हती.

आशियाई चॅम्पियन नेमबाज सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत ५८५ गुणांची कमाई केली होती. यासह त्याने तिसरे स्थान मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. ज्यामध्ये त्याने ३८ गुणांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात मात्र त्याला चांगली सुरुवात करता आली नव्हती. ६ खेळाडूंमध्ये सुरू असलेल्या या लढतीत तो चौथ्या स्थानी होता. परंतु शेवटी त्याने जोरदार पुनरागमन केले आणि अंतिम सामन्याच्या ९ फेऱ्या झाल्यानंतर तो अव्वल स्थानी होता.

तसेच इतर भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर, एकही खेळाडूला उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नाहीये. २६ फेब्रुवारी पासून सुरू झालेली ही स्पर्धा ८ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. या स्पर्धेत ६० देशातील एकूण ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.