'मी एक दिवस त्याला नक्की मारेन', शोएब अख्तरने वीरूला दिली धमकी

'मी एक दिवस त्याला नक्की मारेन', शोएब अख्तरने वीरूला दिली धमकी

पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा आपल्या भन्नाट वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. हे दोघेही खेळाडू जेव्हा आमने सामने यायचे त्यावेळी दोघांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगायची. २००४ मध्ये अनेकदा हे दोघे खेळाडू आमने सामने आले होते. त्यावेळी फलंदाजी आणि गोलंदाजीसह या दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा हे दोन्ही खेळाडू आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागला धमकावले देखील आहे. काय आहे नक्की प्रकरण ? चला पाहूया.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर हे दोघेही समालोचकाची भूमिका पार पाडत आहेत. दरम्यान भारताचा युट्यूबर तन्मय भट्ट याने शोएब अख्तरला आपल्या शो वर येण्याचे आमंत्रण दिले होते. ज्यामध्ये शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागला धमकी दिली आहे.

तन्मयने आपल्या शो मध्ये, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले जोक्स मोठ्या स्क्रीनवर दाखवायला सुरुवात केली. त्यामध्ये वीरेंद्र सेहवागने २०१७ मध्ये केलेले एक ट्विट देखील होते. तर झाले असे होते की, शोएब अख्तरने एक फोटो ट्विट केला होता,ज्यावर कॅप्शन म्हणून त्याने, "माझा नवीन लूक, मला आशा आहे की, तुम्हाला आवडेल.." असे लिहिले होते. सूट बुटमध्ये असलेल्या शोएब अख्तरच्या फोटोवर अनेक प्रतिक्रीया आल्या होत्या. त्यापैकीच एक प्रतिक्रीया वीरेंद्र सेहवागची होती.

वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रीया देत, शोएब अख्तरला वेटर म्हटले होते आणि एक बटर चिकन, २ नान आणि एक बिअर असे लिहिले होते. हे ट्विट समोर येताच ऑनलाइन शोमध्ये उपस्थित सर्व विनोदी कलाकार पोट धरून हसायला लागले. स्वतः शोएब अख्तरला देखील हसू आवरले नव्हते. त्यावेळी तो हसत म्हणाला की,"मी शप्पत घेतो की एक दिवस मी त्याला नक्की मारेन.." परंतु हे ट्विट वीरेंद्र सेहवागने केले नव्हते. एका युजरने फोटोशॉपचा वापर करत हे ट्विट एडिट करून शेअर केले होते.