जेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी तोडले होते कोट्यवधी भारतीयांचे हृदय, पाहा २००३ वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार - व्हिडिओ

जेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी तोडले होते कोट्यवधी भारतीयांचे हृदय, पाहा २००३ वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार - व्हिडिओ

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. सध्या दोन्ही संघांमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ सारखे दिग्गज फलंदाज आहेत. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी,मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड सारखे गोलंदाज देखील आहेत. या खेळाडूंमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत असते. तसेच २००३ मध्ये रिकी पाँटिंग, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, ॲडम गिलख्रिस्ट, जहीर खान, जवागल श्रीनाथ, ब्रेट ली आणि ग्लेन मॅकग्रा हे दिग्गज खेळाडू होते. 

आजच्याच दिवशी (२३ मार्च) २००३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने आले होते. तो सामना होता २००३ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना. भारतीय संघाला या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाचे जेतेपद मिळवण्याचे स्वप्नं धुळीस मिळवले होते.

 हे दोन्ही संघ स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ होते. कारण ऑस्ट्रेलिया संघाने या स्पर्धेतील एकही सामना गमावला नव्हता. तर भारतीय संघाला केवळ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाकडे दुसऱ्यांदा विश्र्वचषकावर नाव कोरण्याची संधी होती. यासह पराभवाची व्याजासह परतफेड करण्याची देखील संधी होती. परंतु भारतीय संघाला या संधीचे सोने करता आले नाही. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांचे हृदय तुटले होते.

ऑस्ट्रेलिया संघाने उभारला होता ३५९ धावांचा डोंगर 

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला होता. कारण, ऑस्ट्रेलिया संघाने एकही गडी न गमावता १०० धावा केल्या होत्या. कर्णधार रिकी पाँटिंगने या सामन्यात १२१ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ८ षटकारांचा साहाय्याने १४० धावा केल्या होत्या. तर डॅमियन मार्टिनने ८४ चेंडूंमध्ये नाबाद ८८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला ५० षटक अखेर २ गडी बाद ३५९ धावा करण्यात यश आले होते. 

भारतीय फलंदाज ठरले फ्लॉप 

भारतीय संघाला विजयासाठी ३६० धावांची आवश्यकता होती. त्यावेळी हे आव्हान खूप मोठे होते. त्यात जर सामना विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना असेल तर हे काम आणखी कठीण होऊन जातं. कारण त्यावेळी खेळाडूंवर भरपूर दबाव असतो. असेच काहीतरी भारतीय संघासोबत देखील झाले होते. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ३९.२ षटकात अवघ्या २३४ धावांवर संपुष्टात आला. वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी आव्हान पूर्ण करण्यासाठी झुंज दिली, परंतु ही झुंज अपयशी ठरली. वीरेंद्र सेहवागने ८१ तर राहुल द्रविडने ४७ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने हा सामना १२५ धावांनी गमावला होता.