पाकिस्तानचे वुमेन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात; सलग तिसऱ्या सामन्यात चाखली पराभवाची चव

पाकिस्तानचे वुमेन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात; सलग तिसऱ्या सामन्यात चाखली पराभवाची चव

सध्या न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील ९ व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने जोरदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिका संघावर ६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाने २२३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला अवघ्या २१७ धावा करता आल्या.

या सामन्यात पाकिस्तान महिला संघाने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका महिला संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. दक्षिण आफ्रिका संघाकडून प्रथम फलंदाजी करताना लॉरा वॉल्वॉर्टने ९१ चेंडूंमध्ये सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. तर सूने लुसने महत्वाचे योगदान देत, १०२ चेंडूंचा सामना करत ६२ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाला ५० षटक अखेर ९ बाद २२३ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून सलामीवीर फलंदाज नाहिदा खानने चांगली सुरुवात करून दिली होती. तिने या डावात ४० धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. त्यानंतर ओमेमा सोहेलने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. तर निदा दरने तिला चांगलीच साथ देत ५५ धावांचे योगदान दिले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने बाजी मारली आणि हा सामना ६ धावांनी आपल्या नावावर केला.