भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी (Ms Dhoni) याने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. आयसीसी टी२० विश्वचषक, आयसीसी वनडे विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही मानाच्या स्पर्धेत त्याने भारतीय संघाला जेतेपद मिळवून दिले होते. असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार होता. त्याने अनेकदा भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढून विजय मिळवून दिला होता. त्यामुळे आपल्या आवडत्या खेळाडूने अचानक निवृत्ती घेतल्याचे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तुम्ही, आम्हीच नव्हे तर संघातील खेळाडूंना देखील याबाबत काहीच कल्पना नव्हती. नेमकं त्यावेळी काय घडलं होतं, याचा खुलासा भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने (Axar patel) केला आहे.
भारतीय संघ २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावरील मेलबर्न कसोटी सामना झाल्यानंतर धोनीने अचानक निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली. अक्षर पटेल देखील त्यावेळी भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. त्याने ब्रेकफास्ट विद चॅम्पियन या शोमध्ये गौरव कपूरला दिलेल्या मुलाखतीत, सुरेश रैनाचा (Suresh Raina) एक किस्सा सांगितला आहे.
अक्षर पटेलने म्हटले की, "रवी भाईने ( रवी शास्त्री) एक मीटिंग बोलवली आणि सर्वांना सांगितले की, ' माही भाई( एमएस धोनी) निवृत्त होत आहे..' हे ऐकताच सुरेश रैनाला ( suresh raina) अश्रू अनावर झाले होते. संघातील सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले होते. वातावरण शांत झाले होते. मी तर पहिल्यांदाच भारतीय संघासोबत दौऱ्यावर आलो होतो. मला काहीच सुचत नव्हतं. मी स्वतः आश्चर्यचकित झालो होतो."
तसे धोनीने अक्षर पटेल सोबत देखील मस्ती केली होती. याबाबत खुलासा करत अक्षर पटेलने म्हटले की, "बापू ( अक्षर पटेल) तू आला आणि मला घेऊन चाललास. मी आश्चर्यचकित झालो होतो. त्यानंतर माही भाईने मला मिठी मारली. ते माझी खिल्ली उडवत होते."
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर एमएस धोनीने काहीवर्ष मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाला मोलाचे योगदान दिले. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने वनडे आणि टी२० क्रिकेटमधून देखील निवृत्ती जाहीर केली होती. तसेच सुरेश रैनाने देखील याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते.
