येत्या काही दिवसात न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की, क्रिकेट खेळताना दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी ११-११ खेळाडू खेळतात. परंतु आगामी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आवश्यकता भासल्यास ९ खेळाडूंसह देखील सामना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत अधिक बोलताना आयसीसीचे हेड ऑफ इव्हेंट ख्रिस टेटली यांनी म्हटले की, "आवश्यकता भासल्यास आम्ही ९ खेळाडूंसह मैदानावर जाण्याची परवानगी देऊ. तसेच अतिरिक्त दोन खेळाडू असल्यास त्यांना मैदानावर जाण्याची परवानगी दिली जाईल. परंतु तो फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकणार नाही. आम्ही सर्व संघांना काळजी घेण्याचा आणि सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच सर्व संघांनी येताना अतिरिक्त खेळाडूंसह यावे असे देखील आदेश दिले आहेत."
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा न्यूझीलंडमध्ये पार पडणार आहे. ही स्पर्धा येत्या ४ मार्च २०२२ पासून सुरू होणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना ३ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ८ संघांमध्ये होणार असून ६ शहरांमध्ये एकूण ३१ सामने खेळवले जातील. ज्यामध्ये ऑकलंड (ईडन पार्क), हॅमिल्टन (सेडेन पार्क), तौरंगा (बे ओव्हल), वेलिंग्टन (बेसिन रिझर्व्ह), क्राइस्टचर्च (हॅगले ओव्हल) आणि ड्युनेडिन (युनिव्हर्सिटी ओव्हल) यांचा समावेश आहे.
तर उपांत्य फेरीचे सामने हॅगले ओव्हल आणि बेसिन रिझर्व्ह येथे खेळवले जातील.
